BMC Election 2022: मुंबई मनपा निवडणुकीत शिंदेगट आणि भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:16 PM2022-08-04T16:16:06+5:302022-08-04T16:16:58+5:30
BMC Election 2022 Update: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार Rahul Shewale यांनी दिले आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनेक आजी-माजी खासदारांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीमुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्ता कायम राखण्याचं कठीण आव्हान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर उभं राहिलं आहे. दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे, असे संकेत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत शिंदे गटाच्या तयारीबाबत माहिती देताना राहुल शेवाळे म्हणाले की, आमची शिवसेना आणि भाजपा मुंबई महानगरपालिकेसोबतच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकही एकत्र लढणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमच्यासोबत यावं. आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि यापुढेही राहू. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आम्ही शिवसेना भाजपा अशी युती करून लढणार आहोत. तसेच आमच्या युतीचीच सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल, असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबईतील प्रभागांच्या पुनर्रचनेत शिंदे सरकारने राजकीय फायद्यासाठी बदल केल्याचा होत असलेला आरोपही राहुल शेवाळे यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, याआधी प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय राजकीय फायद्यासाठी घेण्यात आला होता. आता त्याविरोधात तक्रार आल्याने ती बदलण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या काही महिन्यात होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना या सरकारने मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेत बदल केला होता. तसेच प्रभागांची संख्या २२७ वरून वाढवत २३६ एवढी केली होती. मात्र काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेतीत प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय बदलून प्रभागांची संख्या पुन्हा २२७ वर आणली होती.