- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)
मुंबई महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार..? हा सगळ्या राज्यापुढचा ‘मिलियन डॉलर’ प्रश्न आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार?, या प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात शिवसेना विभागली असून, पक्षाच्या चिन्हापासून ते शिवसेना कोणाची इथपर्यंतचा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारात आहे. ठाकरे सेनेकडे धनुष्यबाण कायम राहणार की, तो शिंदे गटाला मिळणार की, हे चिन्हच निवडणूक आयोग गोठवून टाकणार..? या तीन प्रश्नांची उत्तरे मुंबई महापालिकेच्या निकालाची दिशा ठरवतील.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी करून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याची तिन्ही पक्षांची इच्छा नाही. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढावे. जेथे, ज्याचे तुल्यबळ उमेदवार आहेत तेथे तिघांनी कमकुवत उमेदवार द्यावेत आणि सामंजस्याने ही निवडणूक लढवावी, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटते. महाविकास आघाडी म्हणून हे तीन पक्ष एकत्र लढले तर त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण शिवसेनेची मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळत नाहीत. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं शिवसेनेला मिळत नाहीत, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढवण्याचा प्रस्ताव ठाकरे सेनेने ठेवला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत सध्या तरी फारसे अस्तित्व नाही आणि काँग्रेसमधील एका गटाला स्वतंत्र लढण्याची खुमखुमी कायम आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात आजही कमळ, धनुष्यबाण आणि हात ही तीन चिन्हेच घराघरात गेलेली आहेत. जर धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले तर काहीजण कमळ हातात धरतील. तर काहीजण काँग्रेस सोबत जातील. ती शक्यता जास्त वाटत असल्यामुळे काँग्रेसला स्वबळाची स्वप्ने पडत आहेत. आपले चिन्ह गोठविले तर आपण पूर्ण तयारीत आहोत. आपल्याला त्याची चिंता नाही, असे उद्धव ठाकरे यांनीच सांगितल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे. हा एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कुठून..? अशी चिंता काँग्रेसच्या त्या नेत्याने व्यक्त केली आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले तर ठाकरे सेनेला सहानुभूती मिळेल का? यावरही राजकीय गणिते मांडून झाली आहेत. मराठीबहुल मतदारसंघात थोडा बहुत परिणाम होईल.
भाजपला मुंबई हवी?मुंबईमध्ये भाजपचा महापौर आणि ठाणे, नवी मुंबई येथे शिंदे गटाचा महापौर असा प्रस्तावही पडद्याआड चर्चेत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ज्या गतीने काम सुरू करत थेट ठाकरे सेनेला लक्ष्य केले आहे, ते पाहता उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडील विद्यमान जागा टिकवण्याचेच मोठे आव्हान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात समन्वय साधून, महापालिकेची रणनीती ठरवण्यासाठी पडद्याआड आशिष कुलकर्णी कामाला लागले आहेत ते वेगळेच..!
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काय?नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीकडे मुंबईत दुसरा चेहरा नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून भाई जगताप यांनी त्यांच्या परीने मुंबई काँग्रेसमध्ये जान आणली आहे. स्वतः आक्रमक होत रस्त्यावर उतरून त्यांनी अनेक आंदोलनेही केली आहेत. जोपर्यंत सगळे काँग्रेस नेते त्यांच्यासोबत येत नाहीत तोपर्यंत मुंबई काँग्रेसला उभारी देण्याचे त्यांचे प्रयत्न सफल होणे शक्य नाही. काँग्रेसमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा अनादिकालापासून कायम आहे. भाई जगताप अध्यक्ष झाले त्याच दिवसापासून त्यांचे पाय खेचण्याचे कामही सुरू झाले आहे. त्याचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. भाई हे नसीम खान, मिलिंद देवरा यांच्या कलाने चालतात, देवरा सांगतील तेच ऐकतात, असा त्यांच्यावर आक्षेप आहे. तो खोडून काढण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे. शिवाय मिलिंद देवरा गेले काही महिने सातत्याने देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करताना, त्यांना भेटताना दिसत आहेत. त्यामुळे हा ट्रॅप नेमका कोणी, कोणासाठी लावला? याचीही सुरस चर्चा मुंबई काँग्रेसमध्ये आहे.
या सगळ्यात मनसे काय करणार हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे. मी माझे पत्ते आत्ताच का उघडून दाखवू?, असे म्हणत राज ठाकरे यांनी त्यांचे काम सुरू ठेवले आहे. त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट पुरेशी बोलकी आहे. पक्ष नोंदणी करताना राज ठाकरे यांनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा शिंदे-फडणवीस जोडीला पूरक आहे. पडद्याआड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी जागा वाटपाचे गणित जर जुळवून आणले तर ठाकरे सेनेला मुंबई महापालिका कठीण आहे. राज्य गेले तरी चालेल, पण मुंबई महापालिका हातून जाऊ नये, या न्यायाने आजपर्यंत शिवसेना वागत आली आहे. आता ठाकरे सेनेला महापालिका मिळवून खरी शिवसेना आपणच आहोत हे दाखवून देण्याची एकमात्र संधी आहे. तीच संधी त्यांना मिळू नये यासाठी पडद्याआडून काही प्रमाणात का होईना, मनसेला ताकद दिली गेल्यास ठाकरे सेनेला मुंबई महापालिकेवर वर्चस्व दाखवणे कठीण आहे.