Join us

BMC Election: ‘करुन दाखवलं’नंतर शिवसेनेचा नवा नारा; आगामी निवडणुकीसाठी बनवली हटके टॅगलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 5:16 PM

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं 'करून दाखवलं' हे घोषवाक्य वापरून आक्रमक प्रचार केला होता. या प्रचाराचा शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता.

अल्पेश करकरे

मुंबई - येत्या काही महिन्यांवर राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सगळेच पक्ष या निवडणुकांच्या कामाला लागलेले दिसत आहेत. त्यात यंदा होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांच लक्ष असणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं(Shivsena) जोरदार तयारी सुरू केलीय. त्यात दर निवडणूकीवेळी अनेक पक्षांच्या प्रचार लाईन वेगळ्या ठरतात, त्याप्रमाणे मुंबईत शिवसेनेची आगामी महापालिका निवडणुकीला घेऊन टॅग लाईन ठरली आहे. मुंबईत अनेक विकास कामांना या काही महिन्यांपासून जोर आल्याचे दिसत आहेत, त्यातच विविध मुंबईतील विकास काम घेऊन "पुढे चला मुंबई"असा शिवसेनेचा नवा नारा असणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोजक्या शब्दांत मोठा अर्थ साधणाऱ्या 'टॅगलाइन'

निवडणूक प्रचारात सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आता बदलत्या प्रचारतंत्राचा वापर करत 'टॅगलाइन'च्या माध्यमातून आपली ओळख ठसवण्याचा प्रयत्न करताना पक्ष दिसतात. मोजक्या शब्दांत मोठा अर्थ साधणाऱ्या 'टॅगलाइन' मतदारांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे या 'टॅगलाइन'च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातच आता आगामी निवडणुकीसाठी सगळेच पक्ष अशा टॅगलाइन बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यातच शिवसेनेची प्रचार लाईन ठरली असल्याची माहिती मिळत आहे.

या टॅगलाइनचा किती फायदा ?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं 'करून दाखवलं' हे घोषवाक्य वापरून आक्रमक प्रचार केला होता. या प्रचाराचा शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुकीत लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी शिवसेनेची रणनीती ठरायला सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे आता शिवसेनेची पुढे चला मुंबई ही टॅगलाइन टीम अदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेनेकडून ठरली आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये शिवसेनेला या टॅगलाईनचा किती फायदा होतो हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल..

मुंबईत कामाचा सपाटा

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेनेसाठी फार प्रतिष्ठेची असणार आहे या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा कामाला लागलेला आहे. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने ही कंबर कसली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत अनेक लोकोपयोगी कामांचं शुभारंभ या काही महिन्यात केला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये नवीन नवीन संकल्पना राबवत, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार गार्डन्स, विविध ठिकाणी सुशोभीकरण आणि अनेक प्रकारच्या सुविधा केंद्र हे उभारलेले आहेत. एकंदरीत मुंबईत अनेक प्रकारची काम करण्यास शिवसेनेने जोर धरल्याचे दिसत आहे. त्यामध्ये मुंबई वंडरलँड, धारावी सुविधा केंद्र, सी व्ह्यू स्पॉट अशा अनेक नवीन संकल्पना राबवल्या आहेत.

टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२२शिवसेना