बीएमसी कर्मचाऱ्यांना मिळणार कापलेले वेतन, आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 01:28 AM2019-06-05T01:28:16+5:302019-06-05T06:13:07+5:30
चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे वेतन कपात केल्याचे आढळल्यास सहायक आयुक्त व खातेप्रमुख यांचे वेतन रोखून धरले जाईल असा इशारा प्रवीण परदेशी यांनी यावेळी दिला
मुंबई : चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे मुंबई महापालिकेच्या सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांचे वेतन कापून घेण्यात आले होते. हे वेतन १० जून पूर्वी खात्यामध्ये जमा करा असे आदेश आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले.
चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेत्यांनी आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी अॅड़ सुखदेव काशीद ,अॅड़ महाबळ शेट्टी ,वामन कविस्कर ,बाबा कदम ,सत्यवान जावकर ,अॅड़ प्रकाश देवदास ,बा शि साळवी,सुभाष पवार ,दिवाकर दळवी आदी उपस्थित होते.
चुकीच्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे वेतन कपात केल्याचे आढळल्यास सहायक आयुक्त व खातेप्रमुख यांचे वेतन रोखून धरले जाईल असा इशारा प्रवीण परदेशी यांनी यावेळी दिला.तसेच जानेवारी २०१९ पासून कामावर असून सुद्धा गैरहजेरी दाखविली असेल किंवा रजा/नैमित्तिक रजा दाखविल्या असेल तर पडताळणी करून त्यांची हजेरी लावली जाईल असेही त्यांनी सांगितले.
गटविमा योजना त्वरित लागू करणार
राज्य शासनाच्या विमा योजनेप्रमाणे मुंबई महापालिकेच्या कामगार कर्मचाºयांना त्वरित विमा लागू केली जाईल. तसेच दि.१ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कामगार -कर्मचाºयांनी औषादोपचार किंवा शस्रक्रिया केलेली असेल अशांचे देय्य बिले देण्यात येतील असेही आश्वासन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले.