Join us

पालिकेचे कर्मचारी ३ वर्षे निवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत; युनियनने वेधले पालिका आयुक्तांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:39 AM

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांतून निवृत्त झालेले अनुसूचित जमातीमधील ४० अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. परिणामी, त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ आणि मासिक निवृत्ती वेतन मिळालेली नाही, याकडे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग   करण्याबाबतच्या परिपत्रकाची कार्यवाही झाली नसल्याने २०२० पासून अशा ४० कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे लाभ आणि मासिक निवृत्ती वेतन मागील चार वर्षांपासून दिलेले नाही. या कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे युनियनने म्हटले.

१)  या कर्मचाऱ्यांची ३० ते ३५ वर्षांची सेवा झाली आहे. २०२० ते २०२२ या कोरोनाच्या तीन वर्षांच्या काळात बहुसंख्य कर्मचारी निवृत्त झाले. 

२) त्याचवेळी प्रशासकीय कामकाजामध्ये विस्कळीतपणा आणि अनियमितता आल्यामुळे  कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग कारण्याबाबतच्या कार्यवाहीची पूर्तता झालेली नाही. 

३) या कर्मचाऱ्यांची सेवा विचारात घेऊन विशेष बाब म्हणून त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे, असे गृहीत धरून मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचे निवृत्ती  वेतन देण्याचे आदेश खातेप्रमुखांना देण्यात यावेत, अशी विनंती युनियनने आयुक्तांना  केली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका