पार्किंग समस्या सोडवण्यासाठी BMC चं एक पाऊल पुढे; वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 03:47 PM2021-05-30T15:47:31+5:302021-05-30T15:47:52+5:30

या मंजुरी नुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची सदर कार्यवाहीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BMC goes one step further to solve parking problem; Approval to establish parking authority | पार्किंग समस्या सोडवण्यासाठी BMC चं एक पाऊल पुढे; वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता

पार्किंग समस्या सोडवण्यासाठी BMC चं एक पाऊल पुढे; वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता

googlenewsNext

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रासाठीचा विकास आराखडा -२०३४' आणि संबंधित 'विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४' नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाहनतळ व्यवस्थापन विषयक बाबींसाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार वाहनतळ प्राधिकरण निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यास व त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादार यांची व तज्ज्ञ मंडळींची नेमणूक करण्यास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या स्थायी समिती बैठकीदरम्यान नुकतीच मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

या मंजुरी नुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांची सदर कार्यवाहीसाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर 'टाटा सामाजिक विज्ञान संस्थान' यांची बाह्य सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत संबंधित विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती नवनियुक्त वाहनतळ आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनतळाची समस्या बिकट होत चालली आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी सोयीची, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्य प्रकारे व विनिमयांसह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

वरील अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विकास आराखडा आणि 'विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४' मध्ये महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील व रस्त्यालगतच्या वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण करण्याकरिता महापालिका स्तरावर वाहनतळ प्राधिकरणाचे गठन करावे; अशी शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याकरिता 'अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)' यांची 'वाहनतळ आयुक्त' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नियोजित 'बृहन्मुंबई वाहन प्राधिकरण' चे गठन करण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेली तज्ज्ञ मंडळी प्रामुख्याने खालील ९ कामे पार पाडणार आहेत.

नियोजित वाहनतळ प्राधिकरणाद्वारे व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासह धोरण निश्चिती आणि शुल्क रचनेचे सुसूत्रीकरण

निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती, तर‌ इतर तज्ज्ञांची नियुक्ती बाह्य सेवा पुरवठादारांमार्फत उपलब्ध करून घेणार

१. मुंबई महापालिका अधिनियमांतर्गत बृहन्मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी असणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे व मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची संस्थात्मक निर्मिती करणे.

२. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील वाहनातळ व्यवस्थापन विषयक सर्वसमावेशक आराखडा तयार करणे

३. वाहनतळ दर निश्चितीबाबत धोरण व अभ्यास

४. वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधीची कार्यवाही

५. वाहनतळाच्या अनुषंगाने विविध स्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे

६. वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे

७. शहरातील शासकीय, व्यवसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने 'वाहनतळ विषयक माहितीचा साठा' तयार करणे

८. वाहन विषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने 'वाहनतळ मार्शल' यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास

९. विकास आराखड्यातील वाहनतळ आरक्षणाबाबत कार्यवाही करणे; भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे; भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाणपुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे.

Web Title: BMC goes one step further to solve parking problem; Approval to establish parking authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.