मुंबई : मास्कबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात महापालिकेने वेगाने कारवाई सुरू केली आहे. मास्क न लावता वावरणाऱ्या नागरिकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना सध्या प्रत्येकी २०० रुपये आर्थिक दंड करण्यात येतो. यानुसार आतापर्यंत २ लाख २६ हजार ३०१ नागरिकांविरोधात कारवाई करून एकूण ४ कोटी ७९ लाख ०७ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये दंड आकारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर वाढला आहे. मास्कचा प्रत्येकाने आवर्जून वापर करावा, यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
टाळेबंदी टप्प्याटप्प्याने संपुष्टात येत असताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर वाढला आहे. प्रारंभी टाळेबंदी असल्याने स्वाभाविकच नागरिकांचा सार्वजनिक वावर अत्यंत मर्यादित होता. टाळेबंदी संपुष्टात येत असताना सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कचा प्रत्येकाने आवर्जून वापर करावा, यासाठी जनजागृतीही करण्यात आली आहे. विनामास्क संदर्भातील दंडात्मक कारवाई वेगवान करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी योग्यरीत्या व सातत्याने मास्कचा वापर करावा, हा कारवाईमागील उद्देश आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून आता अधिकाधिक नागरिक फेसमास्क वापरत आहेत.