Join us

पालिकेच्या मदतीला मुदत ठेवी आल्या धावून;  ८० हजार कोटींच्या ठेवी; १,६०० कोटींचे व्याज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:29 AM

कोरोना काळात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्यामुळे महापालिकेची मदार मुदत ठेवींवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यापासून मुंबई महापालिकेवरील आर्थिक भार वाढला आहे. संसर्ग रोखणे, रुग्णांवर मोफत उपचार व औषध-उपकरणांसाठी दरमहा दोनशे कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. तर आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक रक्कम गेल्या वर्षभरात प्रशासनाने खर्च केली आहे. अशा अडचणीच्या काळात विविध बँकांमधील ८० हजार कोटींच्या मुदत ठेवी आर्थिक दिलासा देत आहे. या ठेवींवरील व्याजाच्या रूपात १६०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

कोरोना काळात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्यामुळे महापालिकेची मदार मुदत ठेवींवर आहे. त्यानुसार मोठ्या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांसाठी ५२ हजार ९५२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीमधून निधी वापरण्याची तरतूद विद्यमान आर्थिक वर्षात करण्यात आली आहे. ८० हजार कोटींच्या मुदत ठेवीमध्ये २६ हजार २८३ कोटी पालिका कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनास्वरूप आहेत. त्यामुळे मुदत ठेवीतून व्याजाच्या स्वरूपात वार्षिक १८०० कोटी रुपये पालिकेला मिळतात.

कोरोना काळामुळे व्याजात घट...राष्ट्रीयीकृत व खासगी अशा विविध बँकांमध्ये मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत. यामधून वार्षिक १८०० कोटी रुपये व्याज पालिकेच्या तिजोरीत जमा होत असते. मात्र मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर वार्षिक व्याजातही ७०० कोटी रुपयांची घट झाली. मात्र विद्यमान आर्थिक वर्षात पुन्हा १६०० कोटी रुपये व्याज पालिकेला प्राप्त होणार आहे

मागील दाेन वर्षांत उत्पन्नात झाली घटnसन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जाहीर केला. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात उत्पन्नात मोठी घट होऊन अर्थसंकल्पात मात्र १६.७ टक्के एवढी वाढ करण्यात आली. nत्यावेळी मुदत ठेवींच्या जोरावर बाजारातून बॉण्ड खरेदी करण्याचा विचारही पालिका प्रशासनाने केला होता. मात्र प्रत्यक्षात मुदत ठेवीमधून दहा हजार ५६४ कोटी रुपयांचे अंतर्गत बिनव्याजी कर्ज काढण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका