भूमिगत बाजाराला आले भलतेच अडथळे; रस्ते विभागाच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 10:02 AM2024-04-06T10:02:40+5:302024-04-06T10:04:59+5:30
शहरातील ठिकाणे विकास नियंत्रण नियमावलीच्या अखत्यारित येत असल्याने भूमिगत बाजारांसाठी येथील जागा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
मुंबई : शहरातील ठिकाणे विकास नियंत्रण नियमावलीच्या अखत्यारित येत असल्याने भूमिगत बाजारांसाठी येथील जागा उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विकास नियंत्रण अखत्यारितील सेवा वाहिन्यांना हानी न पोहोचता भूमिगत बाजाराला जागा कशी उपलब्ध करता येईल, याचा अभ्यास करण्याची सूचना पालिकेच्या रस्ते विभागाला मार्केट विभागाने केली आहे. या विभागाच्या सल्ल्यानुसार शहरात भूमिगत बाजाराची संकल्पना पुढे नेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईतील रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासही जागा नसते. हे चित्र बदलण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणेच भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. मुंबईतील जागेचा अभाव लक्षात घेऊन दिल्लीच्या धर्तीवर मैदानांमध्ये भूमिगत बाजार उभारण्यात येणार आहेत.
भूमिगत बाजाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास शहरातील पार्किंगसह, वर्दळीची समस्या सोडविता येईल, असा विश्वास पालिकेचे अधिकारी
व्यक्त करत आहेत.
सेवा वाहिन्यांना हानी न पोहोचता भूमिगत मार्केट कसे करता येईल, यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाला अभ्यास करण्याची सूचना पालिकेच्या मार्केट विभागाने केली आहे. त्या संदर्भात रस्ते विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून, या विभागाचे सल्लागार पॅनल याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘एमटीएनएल’चे दूरध्वनी केबलचे जाळे, महानगर गॅसची गॅस वाहिनी, पालिकेच्या जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिनी, पर्जन्य जलवाहिनी आदी प्राधिकरणांच्या केबल व वाहिन्या रस्त्याखाली आहेत.
आंब्रे उद्यानाचे नियोजन सुरू -
अंधेरी पश्चिमेकडील आंब्रे उद्यानाखाली भूमिगत बाजार विकसित करण्यात येणार आहे. जवळपास चार हजार ५९ चौरस मीटरचा हा परिसर आहे.
या परिसरासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, याचे नियोजन सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यात एकीकडे फेरीवाला बाजार, तर दुसरीकडे पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
दादर येथील खोदादाद सर्कलचा विचार-
१) दादर येथील खोदादाद सर्कल तसेच कोतवाल उद्यान येथे रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असते. दादर हे मध्यवर्ती स्थानक असल्याने येथे फेरीवाल्यांचीही खूप वर्दळ
असते.
२) येथे भूमिगत बाजाराची कल्पना राबविल्यास नागरिकांनाही सुरक्षित रस्ता ओलांडणे शक्य होईल आणि फेरीवाल्यांचाही प्रश्न सुटणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
३) सीएसएमटी स्थानकाच्या ‘सबवे’वर आधारित संकल्पना येथे राबविण्याचा पालिकेचा मानस आहे.