Ravindra Waikar ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि लोकसभा निवडणुकीत निसटता विजय मिळवलेले रवींद्र वायकर यांना कथित जमीन घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून वायकर यांच्याविरोधात तक्रार दिल्याचं सांगत आता मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकरांना क्लीन चिट दिली आहे. जोगेश्वर भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट सादर केल्याने वायकर यांच्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.
महापालिकेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून प्रकरणाचा त्यांचा तपास सुरू केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर वायकर यांची चौकशीही ईडीकडून करण्यात आली होती. दरम्यान वायकर यांनी हॉटेल बांधकामासाठी परवानगी घेताना माहिती दडवून ठेवल्याचा आरोप झाला होता.
जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा आरोप होता. या प्रकरणी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पालिकेत कार्यरत सब-इंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर केल्याने वायकर यांना दिलासा मिळाला आहे.