Join us

महापौर बंगल्याची जागा अखेर बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 2:27 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे.

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे. यामुळे आता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लवकरच महापौर बंगला सोडून राणीच्या बागेतीलपर्यायी निवासस्थानी राहायला जावे लागणार आहे. महिनाअखेरीसपर्यंत स्मारकाच्या भूमिपुजनाचाही कार्यक्रम पार पाडण्यात येणार, अशी माहितीदेखील समोर आली आहे. 

(मी महापौर बंगला सोडतोय - विश्वनाथ महाडेश्वर)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कोणत्याही प्रकारे तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे. 

मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 स्वेअर फूट एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल.

 सन 1928 साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर 1962 साली बीएमसीने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन 1964-65 मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचेही समितीने म्हटले आहे. 

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नवीन प्लॅन तयार करण्यात आला असून त्याचे डिझाईन आर्किटेक आभा नरेन लांबा यांनी बनवले आहे. या बंगल्यात बाळासाहेबांच्या कार्टुनचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केली जाऊ नये, अथवा बंगला परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे पुरातत्व विभाग आणि संवर्धन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :महापौरबाळासाहेब ठाकरे