मुंबई : पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणाऱ्या ठिकाणांची वाढ गृहीत धरून मुंबई महापालिकेने पाणी उपसा करणाऱ्या पंपांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४८१ पंप पालिका दोन वर्षांसाठी भाड्याने घेणार असून, त्यासाठी १२६ कोटी रुपये मोजणार आहे. गेल्यावर्षी ९२ कोटी रुपये खर्च करून ३८० पंप बसवण्यात आले होते.
मुंबईत यावर्षी रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. अनेक भागांत उड्डाणपूल, तसेच मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सखल भाग निर्माण झाले असून, पाणी साचण्याची १०० ठिकाणे वाढल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तेथे पाणी उपसा करण्यासाठी पंपांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
पाण्याचा वेगाने निचरा -
पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्जन्य जलवाहिन्या सक्षम करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. तरीही पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. समुद्राला भरती असेल आणि त्याच वेळी मुसळधार पाऊस होत असेल, तर पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी फ्लड गेट बंद ठेवावे लागतात. सखल भागात पाणी साचल्यास ते पंपाने उपसण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे पंपांची संख्या वाढवण्यात आली आहे.
नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण -
२६ जुलैच्या महाप्रलयानंतर पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, नाल्यांचे रुंदीकरण, नवीन पम्पिंग स्टेशनची उभारणी आदी कामे हाती घेतली आहेत. नेहमीच्या सखल भागात पाणी साचू नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
...येथे बसवणार पंप
१) ४८१ पंपांपैकी शहर भागात १८७, पूर्व उपनगरात १२४ आणि पश्चिम उपनगरात १६६ पंप बसवण्यात येणार आहेत.
२) सर्वाधिक १८४ पंप कुर्ला, मालाड, वांद्रे, सांताक्रूझ, कुलाबा, चर्चगेट, वडाळा आणि नायगाव येथे बसवण्यात येणार आहेत.