मुंबई : पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये मागील काही वर्षांपासून घट होताना दिसून येत आहे. २०२१-२२ साली ९१ हजार कोटींच्या मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी यंदा ८१ हजार ७७४ कोटींवर आल्या आहेत. पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये मागील चार वर्षात जवळपास दहा हजार कोटींची घट झाली आहे. मागील काही वर्षांत पालिकेने मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुदत ठेवीची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरण्यात येतो असे अर्थसंकल्प मांडताना आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
विविध विभागांची शिल्लक, कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रक्कम याचा मुदत ठेवींमध्ये समावेश असतो. त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. पालिकेच्या मुदत ठेवींमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जातात.
कुठे आणि कसा वापर?
सध्या पालिकेकडे उपलब्ध ८१ हजार कोटींच्या मुदत ठेवीपैकी ३९ हजार ५४३ कोटी रक्कम कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन, उपदान, इतर विशेष निधी, कंत्राटदार, पक्षकार यांसाठी वापरणे बंधनकारक असते. त्यामुळे त्या रकमेचा वापर पालिकेला विकास कामे, मोठे प्रकल्पांसाठी करता येत नाही. मात्र उर्वरित ४२ हजार २३० कोटींचा वापर विकास निधीसाठी वापरण्यात येणार आहे.
सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प असे खर्चिक आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रकल्पांसाठीचा निधी हा मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदतठेवी कमी होत आहेत.
अशी लागली उतरती कळा
कोरोना काळानंतर बांधकामाच्या प्रिमिअममध्ये सवलत दिली होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली व पालिकेला मार्च २०२२ मध्ये १४ हजार ७५० कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवी मार्च २०२२ मध्ये तब्बल ९१ हजार कोटींच्या पुढे गेल्या होत्या. त्यानंतर मुदत ठेवींना उतरती कळा लागली आहे.