Corona In Mumbai: मुंबईतील सर्व चौपाट्या ३० एप्रिलपर्यंत बंद; महापालिकेचा महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:12 PM2021-04-06T19:12:11+5:302021-04-06T19:12:35+5:30
गिरगाव, जुहू, दादर, माहीम, गोराई अशा काही प्रमुख चौपाट्या आहेत. (BMC has directed all beaches in Mumbai to be closed for visitors till April 30)
मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असलेल्या मुंबईतील सर्व चौपाट्या ३० एप्रिलपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आपल्या विभागांतर्गत असलेल्या चौपाट्यांवर कडक पहारा ठेवण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रक पालिका प्रशासनाने मंगळवारी काढले आहे. (BMC has directed all beaches in Mumbai to be closed for visitors till April 30)
गिरगाव, जुहू, दादर, माहीम, गोराई अशा काही प्रमुख चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गिरगाव, जुहू अशा चौपाट्यांवर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका असल्याने महापालिकेने आता सर्व चौपाट्या महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नियमाच्या कडक अंमलबजावणीसाठी पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाला सतर्क राहण्याचे आदेशही आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार चौपाट्यांचा प्रवेश मार्ग फलक लावून बंद करण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयातील फिरते पथकही यावर लक्ष ठेवून असणार आहेत. सोमवारी महापालिकेने भायखळा येथील प्रसिद्ध राणीची बाग पर्यटकांसाठी ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.