मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा दोन हजार 733.77 कोटींचा अर्थसंकल्प सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:00 PM2019-02-04T14:00:15+5:302019-02-04T14:22:25+5:30
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
मुंबई- महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब ज-हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्यासमोर 2019 -20 या आर्थिक वर्षासाठीचा दोन हजार 733.77 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर 24.30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तर ई-लर्निंगसाठी 1.30 कोटी दिले आहेत. डिजिटल क्लासरूमसाठी 8 कोटी 24 लाख, टॉय लायब्ररी व नवीन बालवाडीसाठी 7 कोटी 38 लाख, मिनी सायन्स सेंटर्स 66 लाख, डेस्क व बेंचसाठी 9 कोटी 87 लाख, शालेय इमारतींच्या दुरुस्तीसाठी 201.73 कोटी, व्हर्चुअल क्लासरूम 16.92 कोटी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 कोटींची तरतूद केली आहे. तसेच दरवर्षी महापालिका विद्यार्थ्यांची वार्षिक सहल पेंग्विन पाहण्यासाठी राणीबागेत नेण्यात येणार आहे. दर्जेदार/आंतरराष्ट्रीय शाळेसाठी 2.60 कोटींचा निधी दिला आहे. भाषा प्रयोगशाळा 1.30 कोटी, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब 1.42 कोटी, अर्थसंकल्पात क्रीडा अकादमी सुरू करण्यासाठी तरतूद केली असून, त्यासाठी 3.76 कोटींचा निधी दिला आहे.
संगीत अकादमीसाठी 86 लाख, विद्यार्थांना सुट्टीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी बालभवनची निर्मिती 12 लाख, शाळांच्या मूल्यमापनासाठी 20 लाख, विद्यार्थ्यांना समुपदेशन सेवा 1 कोटी, विद्यार्थी थेट अनुदान योजना, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार असून, त्यासाठी 19.69 कोटी देण्यात आले आहेत. खेळांच्या साधनांसाठी 2 कोटी, विज्ञान कुतूहल भवन 1.20 कोटी, जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी 35 लाख, शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रणासाठी 80 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.