मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उभा राहणार आहे. त्या संदर्भात बुधवारी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मनसेचे विभागअध्यक्ष आणि पदाधिका-यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिका-यांना फेरीवाला क्षेत्रातील शाळा, रुग्णालयांची माहिती घेण्याचे आदेश दिले. कुठे नियमांच उल्लंघन होत असल्यास वॉर्ड ऑफिसला तक्रार करण्याच्या सूचना पदाधिका-यांना दिल्या आहेत.
लवकरच मनसेचं शिष्टमंडळ हॉकर्स झोन संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. महापालिका जाणीवपूर्वक राज ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उभारत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. एलफिन्स्टन पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेने मुंबईत रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मोठी मोहिम उघडली होती.
अनेक ठिकाणी आंदोलन करुन फेरीवाल्यांना पळवून लावले होते. काही ठिकाणी फेरीवाल्यांच्या हल्ल्यात मनसेचे पदाधिकारीही जखमी झाले होते. दादरच्या एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन ठिकाणी एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत हॉकर्स झोनची अंतिम यादी तयार झालेली नाही पण मनेसने आतापासूनच कृष्णकुंजजवळ होणा-या हॉकर्स झोनला विरोध सुरु केला आहे.