BMC : मालमत्ता करात महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक वसुली; आता केवळ ६४.५७ कोटींची तूट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:36 PM2021-04-01T20:36:49+5:302021-04-01T20:37:16+5:30
Mumbai : महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली असल्याने महापालिकेला आता केवळ ६४ कोटी ५७ लाख रुपयांची तूट आहे.
मुंबई - कोरोना काळात वाढलेला खर्च आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेले महिनाभर मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी राबविलेल्या मोहिमेला यश आले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत पाच हजार १३५ कोटी ४३ लाख रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली असल्याने महापालिकेला आता केवळ ६४ कोटी ५७ लाख रुपयांची तूट आहे. (Highest recovery in property tax in BMC history; Now the deficit is only Rs 64.57 crore)
सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पाच हजार दोनशे कोटी रुपये उत्पन्न जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य होते. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरु झाल्यानंतर कर वसुली लांबणीवर पडली. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात कर वसुलीत मोठी घट झाली होती. तर मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत जेमतेम एक हजार कोटी रुपये कर वसुली करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाला कर वसुलीचे लक्ष्य प्रशासनाने दिले.
कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर अटकावणीची कारवाई, जलजोडणी खंडित करणे, वाहने - वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करण्यात आल्या. थकीत कर शेवटच्या दिवशी भरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आशावादी होते. अखेर ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण पाच हजार १३५.४३ कोटी जमा झाले आहेत. ३१ मार्च, २०२० रोजी चार हजार १६१ कोटी रुपये जमा झाले होते, अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली.
सर्वाधिक कर वसुली (आकडेवारी कोटीत)
के पूर्व... अंधेरी पूर्व, जोगेश्वरी ... ५४०.२८ कोटी
के पश्चिम... अंधेरी पश्चिम, विले पार्ले पश्चिम ... ४५४.५२
एच पूर्व.... सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व ... ४११.२५
जी दक्षिण... वरळी... ३९९.२९
एस... भांडुप... ३०३.६८
पश्चिम उपनगर -२५४५.९४ कोटी
शहर - १५०९.५२ कोटी
पूर्व उपनगर - १०७६.९३ कोटी
वर्षभरात ११ हजार ६६१ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली. ‘एच पूर्व’ विभागात सर्वाधिक दोन हजार ५३ मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. तर ४७९ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली. या अंतर्गत ‘टी’ विभागात सर्वाधिक १४१ इतक्या मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली. तर ५० ठिकाणी वाहने, संगणक, वातानुकूलन यंत्रणा जप्त करण्यात आल्या.