मोहित कंबोज यांच्या घराची झाडाझडती; अहवालानंतर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 09:18 AM2022-03-24T09:18:57+5:302022-03-24T09:19:25+5:30

अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

BMC inspects Mohit Kamboj’s Santacruz building for 4 hours | मोहित कंबोज यांच्या घराची झाडाझडती; अहवालानंतर कारवाई होणार

मोहित कंबोज यांच्या घराची झाडाझडती; अहवालानंतर कारवाई होणार

Next

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रुझ (प.) येथील खुशी प्राईड ब्लमोडो इमारतीची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सुमारे साडेतीन तास कसून झाडाझडती घेतली. त्यांच्या मालकीच्या चार मजल्यांसह पूर्ण १४ मजली इमारतीच्या प्रत्येक भागाची, मूळ नकाशाप्रमाणे बांधकाम झाले आहे का, याची पडताळणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत मिरवणूक काढली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रुझ येथील  एसव्ही रोडवरील खुशी प्राईड ब्लमोडो या १४ मजली इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याबाबत एच/पश्चिम विभागाने महापालिका अधिनियम १९८८ अंतर्गत कलम १४४ अन्वये सोमवारी तपासणी करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सहा अधिकाऱ्यांचे पथक पोहोचले. त्यावेळी कंबोज घरी उपस्थित होते. 

त्यांच्या मालकीचे १०, ११, १२ व १३ हे मजले आहेत. हे सर्व मजले व तेथील बांधकाम मूळ नकाशाप्रमाणे आहे का, याची तपासणी करण्यात आली. व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर १४ व्या मजल्यावरील  बांधकाम तपासण्यात आले. सुमारे चार वाजण्याच्या सुमारास पालिकेचे पथक  या इमारतीतून बाहेर पडले. बांधकामाचा मूळ आराखडा व प्रत्यक्षात बांधकामाची पडताळणी करण्यात येत आहे. त्याबाबतचा अहवाल बनविल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

जाणीवपूर्वक कारवाई - कंबोज
आपण नियमबाह्य बांधकाम केलेले नाही. मात्र  जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. परंतु आपण घाबरणार नाही. शिवसेना व महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असे भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांगितले.

घराच्या बांधकामात अनियमितता ?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास केलेल्या तपासणीत, कंबोज यांच्या घरात बांधकामात अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. गॅलरी रेस्क्यू एरिया, अन्य काही ठिकाणी बांधकाम आहे, अनियमितता आढळल्याचे  सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BMC inspects Mohit Kamboj’s Santacruz building for 4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.