मुंबई : पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे ७२ मास्टिक कूकर सयंत्रे उपलब्ध करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सर्व संयंत्रांवर जीपीएस बसवून त्याद्वारे त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात खड्ड्यांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे कसे बुजविता येतील, ते भरताना त्यांचा क्रम कसा असावा, खड्डे बुजविताना ते कसे भरावेत, या संदर्भातील सूचनाही बांगर यांनी दिल्या. प्रत्येक विभागांत नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांसाठी दोन, तर नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी एक मास्टिक कूकर, याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कूकरचा वापर करावा. तसेच नोंदणी प्रक्रिया करून सर्व संयंत्रांची यादी तयार करावी, अशा सूचना त्यांनी रस्ते विभागाला दिल्या आहेत.
पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्त्यांच्या कामांशी संबंधित बाबींचा बांगर यांनी बुधवारी आढावा घेतला. त्यावेळी खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी. मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहेत, याचा अनुभव आपल्या कामातून नागरिकांना आला पाहिजे, त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील, याची खात्री करा, असे निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
‘२४ तासांमध्ये कार्यवाही करा’-
१) खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग ॲप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक, आदी विविध पर्याय पालिकेने नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत. त्याद्वारे येणाऱ्या तक्रारींवर तसेच विभागनिहाय शोधलेले खड्डे शक्यतो २४ तासांत बुजवावेत.
२) खड्डे बुजविण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे. एखाद्या विशिष्ट विभागात अतिरिक्त मास्टिक कूकर आवश्यक असल्यास अन्य विभागांतील तो आणून वापरण्याची मुभा असेल, असे बांगर यांनी स्पष्ट केले.