मुंबई : विडंबन गीताद्वारे महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारी रेडिओ जॉकी मलिष्काला चक्क आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी गुरूवारी पावसाळीपूर्व कामांची माहिती दिली. गेली दोन वर्षे मुंबै तुला बीएमसीवर भरवसा नाय काय! आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात, ... अशी गाणी तयार करून मलिष्काने पालिकेच्या नकात दम आणला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभावित नाचक्की टाळण्यासाठी प्रशासनाने हा खटाटोप करीत सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घेतला.रेड एफ.एम.-९३.५ ची रेडिओ जॉकी मलिष्का हिने तिचे सहकारी आणि अभिनेते अजिंक्य देव यांच्यासह वरळी येथील पालिकेचे लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन आणि पालिका मुख्यालयातील आपत्कालिन कक्षाला गुरूवारी भेट दिली. यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अश्विनी जोशी, आबासाहेब जर्हाड, उपआयुक्त अशोककुमार तवाडिया, उपआयुक्त अशोक खैरे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प)विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता श्रीकांत कावळे, सहायक आयुक्त यमगर, देवेंद्रकुमार जैन यांच्यासह पालिका कर्मचार्यांचा ताफा मलिष्काला पावसाळापूर्व कामांची माहिती देण्यासाठी उपस्थित होता.मलिष्काने यापूर्वी काढलेल्या विडंबन गीतांवर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. तसेच विडंबन गीतानेच तिला प्रत्युत्तर दिले होते. पण प्रशासनाने तिच्यासाठी यावर्षी पायघड्या घातल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर उमटत आहे. एखाद्या क्षुल्लक रेड एफएमच्या मलिष्कासाठी इतक्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती देण्याचा प्रकार म्हणजे पालिकेने स्वत:चाच अपमान करून घेतल्यासारखे असल्याची नाराजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली.चांगली कामे पोहोचवीत...सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यामांनी पालिकेने केलेली चांगली कामे मुंबईकरांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पावसाळ्यासाठी पालिकेने सर्वतोपरी तयारी केली असून मुंबईकरांना गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालिकेला मलिष्काचा धसका; पावसाळ्यातील कामाची दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 1:36 AM