राणेंचा 'तो' बंगला वादात; मुंबई महापालिकेची नोटीस, अधिकारी तपासणीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:09 AM2022-02-18T09:09:33+5:302022-02-18T09:09:55+5:30

केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत; बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार

BMC issues notice to Narayan Rane for inspection of Juhu bungalow | राणेंचा 'तो' बंगला वादात; मुंबई महापालिकेची नोटीस, अधिकारी तपासणीला जाणार

राणेंचा 'तो' बंगला वादात; मुंबई महापालिकेची नोटीस, अधिकारी तपासणीला जाणार

googlenewsNext

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना मुंबई महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. राणेंच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेनं नोटीस बजावली आहे. पालिकेचं पथक राणेंच्या बंगल्यात तपासणीसाठी जाणार आहे. अनधिकृत बांधकामांचं मोजमाप घेण्याचं काम हे पथक करेल.

पालिकेच्या के-पश्चिम वॉर्डनं नारायण राणेंना मुंबई महापालिका कायदा, १८८८ च्या कलम ४८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी के-पश्चिम वॉर्डच्या इमारत प्रस्ताव विभागाचं पथक शुक्रवारी येईल. अनधिकृत बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. 

बंगल्याच्या बांधकामासाठीची कागदपत्रं तयार ठेवण्यासंदर्भात नोटीस पाठवली गेल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेचं पथक अधिश बंगला आणि त्याच्या आवाराची पाहणी करून मोजमाप घेईल आणि फोटो काढेल, असा उल्लेख नोटिशीत आहे. पालिकेचं पथक येईल तेव्हा कागदपत्रांसह उपस्थित राहा, अशी सूचनादेखील करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याची आठवण माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेला करून दिली. त्यानंतर पालिकेनं राणेंना नोटीस पाठवली आहे. अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचं बांधकाम झाल्याचं दौंडकर यांनी सांगितलं. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दौंडकर म्हणाले.

बंगल्याच्या तपासणीनंतर अनधिकृत बांधकामं आढळून आल्यास आणखी एक नोटीस बजावण्यात येईल. बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी त्यांना ठराविक वेळ देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यात अपयशी ठरल्यास पाडकामाची कारवाई करण्यात येईल, असंदेखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Web Title: BMC issues notice to Narayan Rane for inspection of Juhu bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.