मुंबई: लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 'मिशन बिगिन अगेन'मध्ये मुंबई महापालिकेनं काही महत्त्वाचे बदल केले आहेत. पालिकेनं सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, सर्व मंडया, मंडयांचे परिसर आणि दुकानं सोमवार ते शनिवार पूर्णवेळ सुरू राहतील. मात्र मॉल्स आणि मार्केट संकुलं बंदच राहतील. दुकानं, मंडया, मॉल्स, बाजार संकुलं, शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, बगीचे, ओपन जिम याबद्दलची नवी नियमावली मुंबई महापालिकेनं प्रसिद्ध केली आहे. नव्या नियमांनुसार, मॉल्स, बाजार संकुलं वगळता इतर दुकानं, पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मंडया सोमवार ते शनिवार पूर्णवेळ सुरू राहतील. दुकानांसाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात येतील. शनिवारी मात्र दुकानं आणि मंडया बंद राहतील. मॉल्स आणि बाजार संकुलं मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.खुल्या जीम, बगिचे, प्ले एरिया, मैदानांच्या वापरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. खासगी कार्यालयं १० कर्मचारी किंवा १० टक्के कर्मचारी, यापैकी जी संख्या अधिक असेल, त्यानुसार सुरू करता येतील. शाळा, महाविद्यालयं यामधील अशैक्षणिक कामं सुरू करता येणार आहेत. यामध्ये पेपर तपासणं, परिक्षांचा निकाल, ई-अभ्यासक्रम, त्यासंबंधी कंटेट तयार करण्याच्या कामांना परवानगी असेल. मात्र शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बोलवता येणार नाही.