मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांच्या अडचणी कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच राणांना न्यायालयानं सशर्त जामीन दिला. अद्यापही त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याचं मुंबई उपनगरातील घर मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर आहे.
पालिकेनं आज राणा दाम्पत्याला महापालिका कायद्याच्या कलम ३५१ (१ए) च्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला ७ दिवसांत उत्तर द्यावं लागणार आहे. राणा दाम्पत्य ठोस कारण दाखवण्यात अपयशी ठरल्यास, त्यांच्या घरातील अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येईल. राणा दाम्पत्याच्या खारमधील घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली.
राणा दाम्पत्याचं निवासस्थान असलेल्या आठव्या मजल्यावर नियमांचा भंग झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं आहे. त्यामुळे पालिकेकडून राणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता या नोटिशीला राणांकडून काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असेल.