Join us

लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत

By जयंत होवाळ | Published: June 12, 2024 8:19 PM

पालिकेच्या विविध खात्यातून १० हजार ४०० कर्मचारी लोकभा निवडणुकीच्या कामात रुजू झाले होते. यापैकी काहींना त्याही आधी मराठा आरक्षण सर्वेक्षण कामासाठी घेण्यात आले होते.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले असले तरी ८० टक्के कर्मचारी अजून पालिकेच्या सेवेत रुजूच झालेले नाहीत. पावसाळा सुरु झाल्यामुळे पालिकेवरील कामाचा भार  वाढला असताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखी अडचण  निर्माण झाली आहे. जे कर्मचारी अजून सेवेत परतले नाहीत, किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले नसल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या विविध खात्यातून १० हजार ४०० कर्मचारी लोकभा निवडणुकीच्या कामात रुजू झाले होते. यापैकी काहींना त्याही आधी मराठा आरक्षण सर्वेक्षण कामासाठी घेण्यात आले होते. २० मे  रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. ४ जून रोजी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यानी काढला होता. दरम्यान २६ जून रोजी शिक्षक मतदारसंघाची  निवडणूक होत आहे. या प्रक्रियेसाठी काही कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र ते पूर्ण वेळ नाहीत. आपले मूळ कार्यालय सांभाळून आठवड्यातील फक्त दोन दिवस त्यांनी निवडणुकीचे काम करणे अपेक्षित आहे.

लोकसभा निवडणुकीच्या  कामात कार्यरत असलेले फक्त २० टक्के कर्मचारीच पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे किती कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, त्यापैकी कितीजण अजून पालिकेत रुजू झाले नाहीत, याचा आढाव घेण्याचे काम सुरु आहे. कार्यमुक्त केल्यानंतरही पालिकेत रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४भारतीय निवडणूक आयोगमुंबई महानगरपालिका