मुंबई महापालिकेच्या अभियंत्याकडे सापडली १३ कोटींची संपत्ती, एसीबीने दाखल केला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:19 AM2017-12-16T02:19:28+5:302017-12-16T02:21:03+5:30
चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर महिलेने पतीविरुद्धच भ्रष्टाचाराची तक्रार केली. त्यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अधिका-याकडे तब्बल १३ कोटींची मालमत्ता आढळली.
मुंबई : चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर महिलेने पतीविरुद्धच भ्रष्टाचाराची तक्रार केली. त्यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अधिका-याकडे तब्बल १३ कोटींची मालमत्ता आढळली. याप्रकरणी अनिल मेस्त्रीसह पत्नी आणि आईविरूद्ध एसीबीने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल मेस्त्री हा पालिकेच्या अंधेरी के पूर्व विभागात साहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासह त्याची पत्नी आणि आईच्या नावे १३ कोटी, ३६ लाख, ६९ हजार, ६०७ रुपयांची संपत्ती असल्याचे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. लोखंडवालामध्ये वास्तव्यास असलेला मेस्त्री २६ मार्च १९९० मध्ये मुंबई पालिकेत रुजू झाला. १९९५ मध्ये अभिनेत्री आरती नागपाल उर्फ आकृतीसोबत त्याचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतरच दोघांनी एकमेकांवर चारित्र्याचा संशय व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वरचेवर वाद होऊ लागले. ते पोलीस ठाण्यापर्र्यंत पोहोचले. आकृतीने तो भ्रष्ट असल्याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, २००१ पासून मेस्त्री एसीबीच्या रडारवर आला.
मेस्त्रीने पालिकेच्या नोकरीदरम्यान पुणे, लोणावळा, मढ आयलंड, शहापूर येथे बंगले घेतले, तसेच अंधेरी, लोणावळा, खंडाळा परिसरातही काही जमिनी त्याने विकत घेतल्या. अंधेरीच्या लोखंडवालासह कांदिवलीमध्ये त्याच्या मालकीचे घर आहेत, शिवाय चारकोप आणि अंधेरीत त्याचे दुकानही असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता, तर मेस्त्रीनेही पत्नीच पैशांसाठी आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचा दावा केला.
एसीबीने त्याच्या मालमत्तेबाबत केलेल्या चौकशीत त्याच्याकडील कोट्यवधीचा खजिना उघड झाला आहे. मेस्त्री २६ मार्च १९९० ते १९ जून २०१७ या काळात त्याने बेहिशेबी मालमत्ता जमा केली. त्याच्या नावे तब्बल ७ कोटी ७२ लाख ४८ हजार ३८१ रुपयांची मालमत्ता आहे. उत्पन्नापेक्षा ती अधिक आहे, तसेच पत्नी आकृतीच्या नावे ३८ लाख २६ हजार १७८ रुपये, तर मत आई इंदुमती यांच्या नावे ५ कोटी २६ लाख ४ हजार ६१३ रुपयांच्या मालमत्तेची नोंद असल्याचे एसीबीच्या चौकशीत उघड झाले आहे. अशा प्रकारे त्याची एकूण संपत्ती १३ कोटी, ३६ लाख, ६९ हजार, ६०७ एवढी आहे.
पत्नी, आईलाही केले सहआरोपी
मेस्त्री पती-पत्नीला एकमेकांच्या चारित्र्याबाबत संशय होता. यातून त्यांच्यात खटके उडायचे. याचाच राग आल्याने पत्नी आकृतीने तो भ्रष्ट अधिकारी असल्याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह एसीबीकडे तक्रार दिली आणि नकळत तीही यात अडकली. मेस्त्रीच्या भ्रष्टाचाराबाबत आई आणि पत्नी यांना माहिती होती, हे उघडकीस आल्याने या प्रकरणात त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. एसीबीने मेस्त्रीवर पदाचा गैरवापर करून उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा करणे, भ्रष्टाचार करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.