Join us  

'असा' आहे पालिकेचा आरोग्यासाठी प्लॅन; साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 6:09 AM

महानगरपालिकेकडून आय फ्लोज नावाची पूर परिस्थितीची सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका 

यंदाच्या पावसाळ्यात कमी दिवसांत जास्त पाऊस किंवा मुसळधार पडण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यासाठी महानगरपालिकेचा मुख्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, बॅकअप नियंत्रण कक्ष व मनपाच्या २४ प्रशासकीय विभागांतील नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळासह २४ तास कार्यरत आहेत. महापालिकेच्या २४ विभागांचे आपत्कालीन व्यवस्थापन आराखडे तयार असून, आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दल, नौदल, तटरक्षक दल, थलसेना यांची बचाव पथकेही तयार ठेवण्यात आलेली आहेत. नागरिक कोणत्याही आपत्ती परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ‘१९१६’ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

महानगरपालिकेकडून आय फ्लोज नावाची पूर परिस्थितीची सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य पूरप्रवण क्षेत्रे, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व २४ विभागीय क्षेत्रांमधील स्थानिक समस्या आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची माहिती प्राप्त होणार आहे. पालिकेचा व्यवस्थापन विभाग नागरिकांसाठी मदतसेवा क्रमांक संकेतस्थळ, मोबाइल ॲप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हँडल, इन्स्टाग्राम, चॅटबॉट या सर्व माध्यमांतून उपलब्ध असून ही सर्व यादी पालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात पसरत असल्याने एप्रिल महिन्यापासूनच या संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी कृती आराखडा राबविला जातो. शिवाय साथरोग नियंत्रण कक्ष ही कार्यान्वित करण्यात आला आहे. मनपाची वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रुग्णालयात जवळपास ३ हजार खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साथरोगांवर नियंत्रण आणणे असल्यामुळे जितक्या प्रमाणात होईल तितक्या अधिक चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे.यामुळे साहजिक सुरुवातीला रुग्णसंख्या अधिक दिसून येईल, मात्र त्यावर नियंत्रण आणणे आणि त्या रुग्णांना त्यातून लवकरात लवकर बरे करणे, हा उद्देश सफल करता येणे शक्य होईल. यामुळे रुग्णांची मॉरटॅलिटी आणि मॉर्बिडिटी कमी करता येईल. त्यामुळे मुंबईतील अधिकाधिक लॅब्सना या सूचना लवकर देण्यात येणार असून, अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या करून घेण्यात येतील.

टॅग्स :पाऊसआरोग्यमुंबई महानगरपालिका