‘बीएमसी’च्या खेळाडूंनी मारली बाजी, बिपीन फुटबॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:46 AM2018-01-02T03:46:56+5:302018-01-02T03:47:04+5:30
युवा खेळाडूंसाठी हक्काची स्पर्धा असलेल्या बिपीन फुटबॉल अकादमीच्या ३१व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील खेळाडूंनी वर्चस्व राखले.
मुंबई : युवा खेळाडूंसाठी हक्काची स्पर्धा असलेल्या बिपीन फुटबॉल अकादमीच्या ३१व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील खेळाडूंनी वर्चस्व राखले. संपूर्ण स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारलेल्या बीएमसी संघाने उल्हासनगर - अंबरनाथ केंद्राला पराभूत करत जेतेपद उंचावले.
चर्चगेट येथील कर्नाटका स्पोर्टिंग्ज मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात बीएमसी संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना उल्हासनगर्त - अंबरनाथ संघाचा २-० असा पराभव केला. स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या बीएमसीच्या कुमार राठोड याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. अंतिम सामन्यातही त्याने शानदार प्रदर्शन करताना संघाच्या जेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.
एकूण आठ केंद्रांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत बीएमसी संघ पहिल्यांदाच खेळत होता आणि त्यांनी पदार्पणातच थेट जेतेपदाला गवसणी घालत आपली छाप पाडली. त्याचवेळी स्पर्धेच्या अंतिम दिवशी विविध केंद्रातील सर्वोत्तम खेळाडूंनाही पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कासा प्रजापती (चर्चगेट), राजू चौहान (कुलाबा), सुनिल राठोड (बीएमसी), यश टाक (उल्हासनगर - अंबरनाथ), शुभम शिंदे (कांदिवली), प्रित (विरार) आणि यश मिस्त्री (अंधेरी) या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.