मुंबई महापालिकेच्या राजकीय नेत्यांना अन् अधिकाऱ्यांना मिळणार २४ नव्या कोऱ्या गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 11:27 AM2021-07-04T11:27:58+5:302021-07-04T11:29:25+5:30
सध्या महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे २४ स्कोर्पिओ गाड्या आहेत.
मुंबई – कोरोना काळात शासकीय निधी खर्च करण्यावर अनेक बंधनं आली होती. यातच आता मुंबई महापालिकेतील राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसाठी नव्या कोऱ्या करकरीत गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून महापालिका २४ नव्या गाड्या घेणार आहे. यासाठी २ कोटी ७६ लाखाहून अधिक खर्च अपेक्षित असून पुढील ३ महिन्यात या गाड्या महापालिकेत दाखल होतील.
मुंबई महापालिकेतील महापौर, अनेक वैधानिक समित्या, प्रभाग समिती, विशेष समित्या, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुखांना गाड्या देण्यात येतात. सध्या उपलब्ध असणाऱ्या गाड्या प्रमाणापेक्षा जास्त वापरात असल्याने वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. अचानक रस्त्यात वाहन बंद पडल्याने सभा, बैठकांना पोहचण्यास उशीर होत असल्याचं अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे म्हणणं होतं. त्यामुळे या गाड्या देऊन नवीन गाड्या खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सध्या महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे २४ स्कोर्पिओ गाड्या आहेत. त्याऐवजी आता महापालिका महिंद्रा बीएस ६ च्या २४ गाड्या खरेदी करणार आहेत. बाजारभावापेक्षा १३.४० टक्क्यांनी कमी दरात या गाड्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून महापालिकेला मिळणार आहे. त्यासाठी गव्हर्मेंटच्या ई मार्केट प्लेस पोर्टलवर जाऊन खरेदी करण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेकडून नव्या विकत घेण्यात येणाऱ्या एका गाडीची किंमत ११ लाखांपर्यंत आहे. त्यावर इतर कर ५ हजार रुपये असून वाहन नोंदणी आणि आरटीओ, विमा उतरवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असणार आहे.