आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:11 PM2022-02-05T12:11:34+5:302022-02-05T12:13:43+5:30
शिवसेना वि. भाजप संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळणार
मुंबई: पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. त्यात शिवसेनेनं विजय मिळवला. आताच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपनं निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलारांवर सोपवली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं शेलारांच्या नेतृत्त्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली होती. भाजपच्या जागा जवळपास तिप्पट झाल्या होत्या. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं पुन्हा एकदा शेलारांवर विश्वास दाखवला आहे.
आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत दोन टर्म नगरसेवक म्हणून काम केलं. मुंबईतील राजकीय, सामाजिक समीकरणांची त्यांना चांगली माहिती आहे. शहराच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचं मुंबई अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे.
२०१२ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे ३१ नगरसेवक निवडून आले. त्यावेळी पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. त्यानंतर २०१७ मध्ये युती तुटली. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. शेलारांच्या नेतृत्त्वात भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले. भाजपनं शिवसेनेला तुल्यबळ लढत दिली. शिवसेनेच्या ८४ जागा निवडून आल्या. शिवसेनेनं कशीबशी सत्ता राखली. मात्र भाजपनं शिवसेनेला चांगलाच घाम फोडल्याचं या निवडणुकीत दिसून आलं.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे
मुंबई महापालिकेची जबाबदारी शिवसेनेनं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर सोपवली आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य यांनी मुंबईत अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले. आताही ते मुंबईतील अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. पक्ष संघटनेवर त्यांची चांगली पकड आहे.