BMC देणार मुंबईकरांना झटका; सिनेमा, नाटकांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:01 IST2024-01-03T09:00:25+5:302024-01-03T09:01:22+5:30
जर हा प्रस्ताव मान्य झाला तर महापालिकेला वार्षिक १० कोटी रुपये अधिकचा महसूल मिळू शकतो असं BMC ला अपेक्षा आहे.

BMC देणार मुंबईकरांना झटका; सिनेमा, नाटकांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
मुंबई - बीएमसी मुंबईकरांना आणखी एक आर्थिक झटका देण्याची तयारी करत आहे. थिएटर, नाटक, सर्कश, एअर कंडिशन आणि विना एअर कंडिशन सिनेमा हॉलसह मनोरंजन बाबींवर बीएमसीकडून घेतल्या जाणाऱ्या करात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील १३ वर्षापासून मुंबईत थिएटर टॅक्स वाढवला नाही. त्यामुळे आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षात बीएमसीकडून टॅक्समध्ये वाढ होण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावाला महापालिका प्रशासक आणि आयुक्त आय.एस.चहल यांची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
प्रस्तावानुसार, वातानुकुलित थिएटरमध्ये कर २०० रुपये प्रतिनाटक, तर विना वातानुकुलित थिएटरसाठी ४५ ते ९० रुपये प्रतिनाटक कर घेतला जाईल. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर सिनेमा आणि नाटकाच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत २०१०-११ या आर्थिक वर्षात अखेरचे थिएटर टॅक्स वाढवण्यात आले होते. त्यानंतर २०१५-१६ मध्ये हा टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव बीएमसीने तयार केला होता परंतु या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली नाही. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर महापालिकेला वार्षिक १० कोटी रुपये अधिकचा महसूल मिळू शकतो असं BMC ला अपेक्षा आहे.
मल्टिप्लेक्स थिएटरची संख्या वाढली
दरम्यान, मागील १०-१२ वर्षात मुंबईत सिंगल स्क्रिन थिएटरच्या तुलनेत मल्टिप्लेक्स थिएटरच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात १ ते ८ स्क्रीनच्या मल्टिप्लेक्स थिएटरचा समावेश आहे. त्यात तिकीटाची किंमत २०० ते १५५० रुपयांपर्यंत आहे. हा दर सिनेमा, दिवस आणि लोकप्रियता त्यानुसार बदलत राहतो.