Mumbai: मुंबईतून 'क्लीन अप मार्शल' पूर्णपणे हटवले जाणार, लाचखोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:49 IST2025-03-27T11:46:57+5:302025-03-27T11:49:30+5:30
BMC to Discontinue Clean-Up Marshals: लाचखोरीच्या तक्रारींमुळे मुंबईतील क्लीन-अप मार्शलची योजना कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Mumbai: मुंबईतून 'क्लीन अप मार्शल' पूर्णपणे हटवले जाणार, लाचखोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे निर्णय!
Mumbai Clean-Up Marshals: लाचखोरीच्या तक्रारींमुळे मुंबईतील क्लीन-अप मार्शलची योजना कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला आता आयुक्त भूषण गगराणी यांनीही दुजोरा दिला आहे. मुंबईत येत्या ४ एप्रिलपासून क्लीन-अप मार्शल सेवा पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती आहे. मार्शलकडून नागरिकांना धमकावले जाते, हप्ते घेतले जातात, लाच घेतली जाते, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने योजना गुंडाळण्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. नागरिकांसह पालिकेच्या अनेक विभाग अधिकाऱ्यांनीच मार्शलमुळे उपद्रव होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
लाचखोरीच्या आरोपांमुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या पाच रुग्णालयांमधून मार्शलची हकालपट्टी करण्यात आली होती. रुग्णालयात नागरिक, रुग्णांच्या नातेवाईकांनी अस्वच्छता करू नये, यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु, तेथेही ते रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी मध्यंतरी या योजनेचा आढावा घेतला होता. मार्शल पुरवणाऱ्या काही संस्थांनी हेराफेरी केल्याचेही आढळून आले होते. निर्धारित संख्येपेक्षा कमी संख्येने मार्शल पुरवल्याची बाब उघड झाल्यानंतर काही संस्थांना सुमारे ६३ लाखांचा दंडही ठोठावला होता.
काय आहेत तक्रारी?
अस्वच्छता करणाऱ्यांकडून २०० ते २००० रुपये आकारण्याचे अधिकार मार्शलना दिले होते. परंतु, काही मार्शल दंडाची रक्कम घेत, पावती देत नसत. काही मार्शल प्रकरण मिटवण्यासाठी लाच घेत. काही विनाकारण धमकावून लोकांकडून पैसे मागत. कागदाचा कपटा रस्त्यावर टाकला तर तो उचलून कचरा पेटीत टाकण्याची शिक्षा आहे. पण मार्शल तशी सवलत न देता पैसे मागत असत, अशा प्रकारे तक्रारींचं स्वरुप आहे.
आणखी कारणे?
घनकचरा व्यवस्थापन कायद्यात बदल होणार असून दंडाचे नवे स्वरुप तयार होईल. त्यानंतर मग अस्वच्छता पसरवण्याच्या संबंधात सुधारित बदल केले जातील.