Join us

महापालिका म्हणते, पूर्व उपनगर तुंबणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:28 PM

पावसाळ्यात पालिकेचा दावा फोल ठरण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अतिवृष्टी व भरतीच्या काळात मुंबईतील सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाली असून, पूर्व उपनगरात यंदा १५ ठिकाणी पाणी तुंबणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. पालिकेने कितीही दावा केला असला तरी पावसाळ्यात पालिकेचा दावा फोल ठरण्याची चिन्हे आहेत.

पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, पुनर्बांधणी, संरक्षक भिंती बांधणे यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जलद उपसा करणे शक्य होणार आहे. पूर्व उपनगरातील  सखल अशा नेहरूनगर, कुर्ला पूर्व, शेल कॉलनी मार्ग, टिळकनगर रेल्वेस्थानक, जे. एम. एम. मार्ग, कुर्ला पश्चिम, साकीनाका मेट्रो स्थानक, नोफ्रा गेट, शिवाजीनगर पोलिस स्थानक, दुर्गादेवी चौक, मधुकर तुकाराम कदम मार्ग, हजरत अली चौक, देवनार पेरीफेरी मार्ग, प्रयाग नगर, घाटकोपर पूर्व येथील गरोडियानगर, राम नारायण नारकर मार्ग, पंतनगर, रमाबाई नगर या १५ ठिकाणी उपाययोजना पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पूर्व उपनगरांसह संपूर्ण मुंबईत यावर्षी मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, तेथे पालिकेने केलेल्या कामांमुळे पाण्याचा त्वरित निचरा झालेला दिसेल. - पी वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प)

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊस