शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:59 PM2024-11-18T12:59:50+5:302024-11-18T13:00:58+5:30
मुंबई : मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना सुट्ट्या देण्यावरून गोंधळ उडालेला असताना आता आणखी एका पत्रकामुळे संभ्रम वाढला आहे. ...
मुंबई : मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना सुट्ट्या देण्यावरून गोंधळ उडालेला असताना आता आणखी एका पत्रकामुळे संभ्रम वाढला आहे. सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली असल्यास नजीकच्या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करून १८ आणि १९ नोव्हेंबरला या शाळा सुरू ठेवाव्यात, अशी सुधारित सूचना शिक्षणआयुक्तालयाने जारी केली आहे. तर मतदान केंद्र असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांना मात्र १९ नोव्हेंबरला सुट्टी देण्यात आली आहे.
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मतदार केंद्र असलेल्या शाळांना १९ नोव्हेंबरला सुट्टी दिली आहे. दुसरीकडे शिक्षण आयुक्तालयाच्या नव्या पत्रकाने आणखी गोंधळ वाढविला आहे.
यापूर्वीच्या पत्रकात ज्या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती निवडणुकीसाठी झाली आहे, त्या शाळा १८ व १९ ला बंद ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. त्यामुळे या शाळांना दोन दिवस सुट्ट्या दिल्या जातील, असा समज झाला.
मात्र, आयुक्तालयाने दुसरे पत्र जारी करत ज्या शाळेतील सर्व शिक्षक निवडणूक कामात व्यग्र असतील, अशाच शाळांसाठी ही सूचना असून, इतर शाळा सुरूच राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र तिसऱ्या पत्रकाने नवा गोंधळ उडाला आहे.
तिसरे पत्रक आणि नवा गोंधळ
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा या १८ व १९ नोव्हेंबर रोजी सुरू राहतील, याचे नियोजन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे, असे शिक्षण आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या दिवशी सुट्टी हवी!
निवडणुकीचे काम करणाऱ्या शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी आहे. शिक्षकांना निवडणूक साहित्य व मतदान यंत्रे ताब्यात घेण्याकरिता मंगळवारी सकाळी ८ वाजता कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. त्या दिवशी तेथेच मुक्काम करून २० तारखेला पहाटे ५ वाजता निवडणूक कामासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मतदानानंतर कागदपत्रे व मतदान यंत्रे जमा करेपर्यंत कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले ठिकाण सोडता येत नाही. हे सर्व कामकाज सुमारे ४० ते ४५ तास सलग करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरी जायला रात्रीचे २ वाजतील, तर काहींना गावातच थांबावेदेखील लागेल.
अशा परिस्थितीत सकाळी शाळेत उपस्थित राहणे अशक्य असल्याने २१ तारखेचा दिवस निवडणूक कर्तव्याचा समजून शिक्षकांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी शाळा आणि शिक्षकांनी केली आहे.
'शाळा मतदान केंद्र असेल आणि आदल्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेकडून ताब्यात घेतले तरी शाळा भरवायला काहीच अडचण नसते', असे आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.