लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा या प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात महापालिकेने विक्रमी कामगिरी केली आहे. यापूर्वी अमरमहाल ते ट्रॉम्बे जलबोगदा कामामध्ये गेल्य महिन्यात तब्बल ६५३ मीटर खनन करण्यात आले होते. तर आता अमरमहाल ते परळ जलबोगद्याचे ६०५ मीटर खनन काम पूर्ण झाले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये ५२६ मीटर खनन पूर्ण झाल्यानंतर अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये जानेवारी २०२२ मध्ये ६०५ मीटर खनन काम करण्यात आले. यामुळे ११५ दिवसांच्या अल्पावधीत १.७ कि.मी. इतके अंतर पार पाडता आले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत सुरु असलेल्या या भूमिगत जलबोगदा प्रकल्पांच्या कामात पालिकेने नवीन उच्चांक नोंदविला आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱ्या बोगद्याच्या कामामध्ये जानेवारी २०२२ मध्ये ६५३ मीटर खनन करताना एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोनवेळा पालिकेने करून दाखविली. या मार्गिकेवर ३.१० कि.मी. म्हणजेच ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या भागांना दिलासा...
* पूर्व उपनगरामध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगद्यामुळे सायन - माटुंगा, वडाळा, परळ विभागांमध्ये तसेच भायखळा आणि कुर्ला विभागातील काही परिसरात पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल.
* अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा ५.५२ किलोमीटर लांबीचा आहे. त्याद्वारे गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूरमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल.
* हे दोन्ही बोगदे जमिनीखाली १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत आहेत. त्यांचा व्यास ३.२ मीटर आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱ्या भूमिगत जलवाहिन्या या मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत.
* कोविड काळातही या जलबोगद्यांचे काम सुरू राहिल्याने दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत अनुक्रमे २०२६ आणि २०२४ मध्ये पूर्ण होतील. तर चेंबूर ते वडाळा बोगदा सन २०२५ मध्ये सुरू होऊ शकेल.