थकबाकीदारांविरोधात पालिकेने थोपटले ‘दंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 01:33 AM2021-03-03T01:33:50+5:302021-03-03T01:33:55+5:30
मालमत्ता कर : ९ एप्रिलपासून अतिरिक्त दंडाची आकारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मालमत्ता कराच्या जास्तीत जास्त वसुलीवर महापालिकेने भर दिला आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही काही मालमत्ताधारक थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांना ८ एप्रिल २०२१ पर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा ९ एप्रिलपासून संबंधितांवर अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेची आर्थिक बाजू कमकुवत झाली. ही तूट मालमत्ता कराच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी पालिकेने अनेक प्रयत्न केले. मात्र, मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करूनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली. या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तीन हजार ३९२ मालमत्तांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला आहे. यापैकी एक हजार ३७६ कोटी रुपये कर थकविणाऱ्या ३,१७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आठवडाभरातच सुमारे साडेतीनशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.
मात्र अद्याप मालमत्ता कराची सुमारे २० हजार कोटींची थकबाकी आहे. यापैकी किमान दहा टक्के वसूल केले तरी दोन हजार कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होतील. मालमत्ता कराचे लक्ष्य चुकणार असल्याने महापालिकेने त्यात सुधारणा करत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४५०० कोटी वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत केवळ दोन हजार ८७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यामुळे ८ एप्रिलपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकाला अतिरिक्त दंड भरावा लागेल, असा इशारा पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने दिला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता
nमालमत्ताधारक - चार लाख ५० हजार
nनिवासी - एक लाख २७ हजार
nव्यावसायिक - ६७ हजारांपेक्षा अधिक
nऔद्योगिक - सहा हजार
nभूभाग आणि इतर - १२ हजार १५६