लोकल प्रवासासाठी नियोजन सुरू; ६५ स्थानकांवर मिळणार ओळखपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:10 AM2021-08-10T07:10:09+5:302021-08-10T07:10:42+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याकरिता ओळखपत्र देण्यासाठी अॅप तयार करण्यात येत आहे. त्यानंतर, महापालिकेच्या विभाग कार्यालयांबरोबरच ६५ रेल्वे स्थानकांवर हे ओळखपत्र दिले जाणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने क्युआर कोडचे ओळखपत्र संबंधित प्रवाशांना मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी समन्वय सुरू असून, ओळखपत्र देण्यासाठी येत्या दोन दिवसांत हे ॲप तयार होणार आहे. या ॲपवरून क्युआर कोड मिळाल्यानंतर प्रवाशांना लोकलचे तिकीट अथवा पास मिळणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारची टास्क फोर्स, पालिका आणि रेल्वे प्रशासनात समन्वय आहे. दोन डोसनंतर १४ दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यावर या बैठकीत एकमत झाले, तर समन्वयासाठी बैठका सुरूच असल्याचेही त्यांनी सांगितले.
महामुंबईतील प्रवाशांनाही सूट
मुंबईत रेल्वेने दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. आतापर्यंत मुंबईतील १९ लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर ठाणे, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, मीरा-भाईंदर अशा दहा महापालिका मिळून १३ लाख असे ३२ लाख प्रवासी आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत राहणार आहे. क्युआर कोड मिळविण्यासाठी या प्रवाशांची विभाग कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच अन्य पात्र प्रवाशांच्या सोयीसाठी ६५ रेल्वे स्थानकांवर व्यवस्था केली जाणार आहे.
रेल्वेशी चर्चा करूनच लोकल सुरू करण्याची तयारी - पालिका आयुक्त
सर्व महत्त्वाच्या रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी स्पष्ट केले. लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेबरोबर चर्चा करायला हवी होती, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. त्यानंतर, आयुक्तांकडून हे स्पष्टीकरण पुढे आले आहे.
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले. हा निर्णय घेताना केंद्राला विश्वासात घेतले नसल्याचा सूर लावण्यात आला होता. मात्र, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हे गुरुवारी स्वत: आयुक्तांच्या दालनात चर्चेसाठी आले होते. लोकल सुरू करण्याबाबत एक तास चर्चा झाली. या चर्चेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती, असे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुंबईत दोन डोस घेतलेले
१९ लाख
महामुंबईतील प्रवासी
१३ लाख
एकूण - ३२ लाख