मुंबई - सोशल मीडियावर मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेते चक्क गटाराचा वापर भाजी साठवण्याच्या गोडाऊनसारखा करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ वाकोला भागातील असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार महापालिकेने या भागात बसणा-या फेरीवाल्यांचा माल जप्त केला आहे. फेरीवाल्यांवर गुन्हाही दाखल केला असल्याचं कळत आहे.
रस्त्यांवर बसणा-या फेरीवाल्यांचं अनेकदा तेथील स्थानिक दुकानांसोबत साटंलोटं असतं. महापालिका कर्मचारी कारवाई करण्यासाठी आले असता फेरीवाले आपला माल त्यांच्या दुकानात लपवून ठेवतात. मात्र वाकोला भागात याआधी कोणीही कल्पना न केलेली गोष्ट पहायला मिळाली. महापालिका कर्मचा-यांच्या कारवाईपासून पळ काढण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाले फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवत होते. महापालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच सर्व माल या गटारात लपवला जात होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे सत्य समोर आलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे सर्व सुरु होतं अशी माहिती आहे.
असं किळसवाणं कृत्य करणारा कोणी एक नाही तर सगळेच फेरीवाले होते, त्यामुळे सर्व फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे.
पाहा व्हिडीओ -