पावसाळ्यात मॅनहोल उघडे राहिले तर खबरदार! वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 09:58 AM2024-04-05T09:58:49+5:302024-04-05T10:01:05+5:30
पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.
मुंबई : शहरातील उघड्या असलेल्या मॅनहोलवर संरक्षक जाळ्या, झाकणे लावण्याची जबाबदारी यापुढे संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची असणार आहे. आपल्या वॉर्डात किती मॅनहोल उघडे आहेत, ते बंदिस्त करण्यासाठी किती जाळ्या आणि झाकण आवश्यक आहेत याची माहिती घेऊन, त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते बसवून घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची असणार आहे. मे महिन्यापर्यंत या जाळ्या बसवण्याचे उद्दिष्ट असून, पावसाळ्याआधीच हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. मलनि:सारण विभागाचे मुंबईत ७४ हजार, तर पर्जन्यजलवाहिन्या विभागाचे २५ हजारांहून अधिक मॅनहोल आहेत. हे मॅनहोल संरक्षित करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.
यासंदर्भात पालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. अद्याप अनेक वॉर्डांमध्ये मॅनहोलवर नवीन झाकणांसह जाळ्याही बसवण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कामात कोणतीही हयगय होऊ नये यासाठी हे काम वॉर्ड स्तरावर विभागण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती वॉर्ड अधिकारी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून लिखित स्वरूपात घेण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कशा असणार जाळ्या?
पालिकेच्या मलनि:सारण विभागाने स्टेनलेस स्टील, फायबर आणि डक्टाइल लोखंडी जाळ्या बसवण्याचे नियोजन केले. तिन्ही प्रकारांतील १०० सुरक्षित जाळ्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर भागातील मलनि:सारणच्या अखत्यारीतील मॅनहोलवर बसवून त्याचा आढावा घेतला. त्यानंतर मजबूत झाकणांसह डक्टाइल लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला.
कुंपणाचा उपाय-
१) मॅनहोलवरील झाकण चोरीला जाणे, तसेच मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याच्या घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी मॅनहोलवर सायरन वाजून अलर्ट देणारी यंत्रणा मुंबईतील १४ ठिकाणी बसवून त्याची गेल्या तीन महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत होती. चाचणी घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि यंत्रणाही उपयुक्त ठरत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही चाचणी बंद करण्यात आली.
२) मात्र पावसाळ्यात मॅनहोल काही कारणास्तव उघडे राहिल्यास त्याला तात्पुरते कुंपण (बॅरिकेड्स) घालण्यात येणार आहे. काही उघड्या मॅनहोलमध्ये झाडाची फांदी किंवा लाकडी सामान ठेवण्याचेही प्रकार केले जातात. मात्र, तसे न करता आता तात्पुरते बॅरिकेड्स घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचा वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार आहे.