दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पुन्हा काढणार निविदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:27 PM2023-11-10T12:27:52+5:302023-11-10T12:28:33+5:30
दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठीचं १६८७ कोटींचं कंत्राट रद्द केल्यानंतर मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नव्यानं कंत्राटासाठीची निविदा जारी करण्यात येईल
दक्षिण मुंबईतील रस्ते काँक्रिटचे करण्यासाठीचं १६८७ कोटींचं कंत्राट रद्द केल्यानंतर मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नव्यानं कंत्राटासाठीची निविदा जारी करण्यात येईल अशी माहिती गुरुवारी दिली. येत्या तीन आठवड्यात नव्यानं निविदा जारी केली जाईल असं चहल म्हणाले.
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपानं केली होती. पण याप्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही असं सांगत चहल यांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाचही कंत्राटदारांचं कंत्राट रद्द केलं गेले पाहिजे. यासोबतच त्यांच्यावर दंडाची आकारणी केली गेली पाहिजे, अशी मागणी केली. तसंच कंत्राटदाराचं कंत्राट रद्द केलं गेलं हे एका प्रकारे चांगलंच झालं, यातून रस्त्यांच्या काँक्रिटी करणाच्या कामात घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले.
नव्या कंत्राटदाराची नियुक्ती किती दिवसात केली जाईल? अपूर्ण राहिलेली कामं केव्हा पूर्ण केली जातील? एकाच कंत्राटदाराला सगळी कामं दिली जातील की वेगवेगळे कंत्राटदार असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं पालिका आयुक्तांनी द्यावीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
"गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही हेच सांगत आहोत. शिंदे-भाजप सरकारच्या काळातील हा मोठा घोटाळा आहे. आमचं सरकार येईल तेव्हा याची नक्कीच आम्ही चौकशी करू. आम्ही महाराष्ट्राची लूट करू देणार नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले.