Join us

‘देवनार’च्या कचऱ्याला २ कोटींचा सुगंध! डम्पिंगमध्ये वनस्पतिजन्य सुगंधी फवारणी केली जाणार

By सीमा महांगडे | Published: February 21, 2024 9:57 AM

१२ महिन्यांचे कंत्राट, नागरिकांना दिलासा; आगीच्या घटनाही कमी होणार. 

सीमा महांगडे, मुंबई : मुंबईतील सर्वांत मोठ्या देवनार डम्पिंगमध्ये आता वनस्पतिजन्य सुगंधी फवारणी केली जाणार आहे. रोज एका शिफ्टमध्ये १०० लिटर सुगंधी द्रव्याची फवारणी करून दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जाणार आहे. यावेळी केवळ परिसरातील दुर्गंधीचा त्रास कमी होणार नसून डम्पिंग ग्राउंडवर तयार होणाऱ्या मिथेन गॅसमुळे लागणाऱ्या आगीही नियंत्रणात येणार आहेत. १२ महिन्यांच्या या कंत्राटासाठी पालिकेकडून जवळपास २ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे ग्राउंड परिसरातील नागरिकांना दुर्गंधीपासून दिलासा मिळणार आहे. 

सुमारे १२० हेक्टरवर पसरलेले देवनार हे मुंबईतील सर्वांत मोठे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंगमध्ये दररोज सहा ते सात हजार मेट्रिक टन कचरा व २००० ते २५०० मेट्रिक टन डेब्रिज टाकले जाते. कचऱ्यामुळे देवनार, मान खुर्द, चेंबूर, घाटकोपर, कुर्ल्यापर्यंतच्या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. 

डम्पिंगचे प्रदूषण :

  देवनार डम्पिंग ग्राउंडमधून होणारे प्रदूषण फक्त एका विभागापुरते मर्यादित राहिलेले नाही. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवरून निर्माण होणारे धूर, विषारी वायू व धूलिकण हवेच्या झोताबरोबर सर्वत्र पसरतात. 

  मुंबईच्या परिसरात निर्माण झालेला धूर व धुक्याचा पडदा (स्मॉग) शरीराला अतिशय अपायकारक आहे. खास करून श्वसनाचे विकार असलेले पेशंट, लहान मुले व हृदयरोगी यांच्यासाठी हे अपायकारक आहे. 

  दूषित वातावरणामुळे डोळ्यांची जळजळ, दम लागणे, खोकला येणे असाही त्रास होतो. 

  मुख्य म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना फुफ्फुसाचा संसर्ग होऊ शकतो व श्वनसाचे विकार बळावतात.

२०१६ नंतर मिथेन वायूमुळे मोठी आग लागली नाही. देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्ट आल्याने २०२५ पर्यंत ते बंद करण्यास आधीच मंजुरी देण्यात आली आहे, मग पालिकेने पुन्हा एन्झाइम आधारित बायोकल्चरसाठी निविदा का मागवल्या आहेत? देवनार डम्पिंग ग्राउंडवर बंद करण्याचा पालिकेचा सध्या विचार नाही का? तर तसे स्पष्ट करावे. नाहीतर ही फवारणी म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. या निविदा मागवण्यापेक्षा पालिकेने लवकर देवनार डम्पिंग बंद करण्याची तयारी करावी.- फैयाज आलम शेख, अध्यक्ष, गोवंडी न्यू संगम वेलफेअर सोसायटी संस्था

१) मिथेन गॅसमुळे लागणाऱ्या आगीही नियंत्रणात येणार

२) पालिकेकडून २ कोटींचा खर्च करण्यात येणार

३) ‘देवनार’मध्ये रोज सहा ते सात हजार मेट्रिक टन कचरा

४) बायोकल्चर हे सुंगंधी द्रव्य पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्याने डम्पिंग परिसरातील हवेतील धूलिकण जमिनीवर बसतात व वातावरणातील प्रदूषणाची मात्रा कमी होण्यास मदत होते, असा दावा पालिकेने केला.

फवारणीत कपात? 

१) देवनार कचराभूमीत पूर्वी प्रतिपाळी २०० लिटर म्हणजेच दिवसाला ६०० लिटर सुगंधी द्रव्य फवारले जात असे. यामुळे कचऱ्याची दुर्गंधी कमी होऊन कचराभूमीत काम करणारे कर्मचारी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचा त्रास कमी होत असे.

२) या कचराभूमीवर सुगंधी द्रव्य फवारणीसाठी पालिकेने दोन ट्रॅक्टर व एक पाण्याचा टँकर वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढल्या होत्या; मात्र या निविदांमध्ये सुगंधी द्रव्याचे प्रमाण महिन्याला १५०० लिटरवर आणले गेले आहे. 

३)  हे सुंगधी द्रव्य नैसर्गिक असायला हवे आणि त्यात आगीवर नियंत्रणाची क्षमता असायला हवी, अशा अटी पालिकेने जारी केलेल्या निविदेत नमूद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकचरा