सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:39 AM2024-03-13T10:39:02+5:302024-03-13T10:41:53+5:30
वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत आहे.
मुंबई : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत असल्याने यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल युज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यानुसार, महापालिकांची विशेष पथके तयार केली जाणार असून, ही पथके बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, भाजी मार्केटमध्ये भेटी देत दोषींवर दंडात्मक कारवाई करणार आहे.
सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवण यावर २०१८ सालच्या प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी आहे. मात्र, तरीही सिंगल युज प्लास्टिकचा वापर वाढत आहे. त्यामुळे या बंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकांनी याची अंमलबजावणी करून यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दहा दिवसांत सादर करावा लागणार आहे, असे निर्देश मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत.
यांचा असेल समावेश - मोक्याच्या सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक लावून बंदीची जनजागृती केली जाईल. या स्थळांत एसटी डेपो, रेल्वे स्थानक, बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालयीन परिसराचा समावेश आहे.
या वस्तूंच्या उत्पादन, विक्री, साठवणीवर बंदी -
१) सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या)
२) नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलीन बॅग्स - ६० ग्रॅम प्रती चौरस मीटर (स्क्वेअर मीटर)
३)प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) आदी.
४) हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी (कंटेनर व बाउल)
५) प्लास्टिक थर असणाऱ्या पेपर-ॲल्यूमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा
६) सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोल , प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या
७) आईस्क्रीम कांड्या
८) प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी)