पाणीपट्टीत ८ टक्के वाढ? प्रस्ताव आयुक्तांना सादर; पाणीपुरवठ्यातील वाढत्या खर्चाची पालिकेला चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:47 IST2024-12-26T06:46:58+5:302024-12-26T06:47:27+5:30
पाणीपट्टीवाढीच्या प्राथमिक प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तो मान्यतेसाठी पाठविणार

पाणीपट्टीत ८ टक्के वाढ? प्रस्ताव आयुक्तांना सादर; पाणीपुरवठ्यातील वाढत्या खर्चाची पालिकेला चिंता
मुंबई : मुंबईकरांच्यापाणीपट्टीत ८ टक्के वाढ करण्याचा प्राथमिक प्रस्ताव महापालिकेच्या जल अभियंता विभागाने आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला. पाणी पुरवठ्याच्या विविध बाबींवरील खर्च वाढत असून, त्याच्या पूर्ततेसाठी ही वाढ अपरिहार्य असल्याचा निष्कर्ष जल अभियंता विभागाने काढला.
पाणीपट्टीवाढीच्या प्राथमिक प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तो मान्यतेसाठी पाठविणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी पाणी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता; परंतु नव्या वर्षात मुंबईकरांना पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे; मात्र पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ केली जाईल की पुन्हा प्रस्ताव पुढे ढकलला जाईल, याबद्दल उत्सुकता आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली कर वाढविणे अन्यायकारक आहे. करवाढ केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिला.
मगच अंतिम प्रस्ताव प्राथमिक प्रस्ताव महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला आहे. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर लेखापरीक्षण विभागाशी सल्लामसलत करून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्यासाठी वीज, परिरक्षण, देखभाल • आणि प्रशासकीय कामांचा खर्च दरवर्षी वाढत असल्याने प्रशासनाने दरवर्षी सरसकट ८ टक्के पाणी दरवाढ करण्यास स्थायी समितीकडून २०१३ मध्ये मान्यता मिळवली होती. त्यानुसार दरवर्षी जूनमध्ये दरवाढ केली जाते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांस्तव पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
यंदा पाणीपुरवठ्यासाठीचा वाढता खर्च लक्षात २ घेऊन पाणीपट्टीवाढीचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी, तसेच धरणांच्या देखभालीसह इतर खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च या सर्वांची गोळाबेरीज करून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
आधी व्यवस्था करा, मग चर्चा करा
मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असल्यामुळे ती स्वतः निर्णय घेऊ शकते; परंतु मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचेल अशी संपूर्ण व्यवस्था निर्माण करा. मुंबईकरांना दूषित पाणी नको, पाण्याची गळती नको, पाण्याच्या वेळेत कमतरता नको, पाइप फुटल्यामुळे पाणीपुरवठा झालाच नाही, अशी परिस्थिती येणार नाही याची व्यवस्था निर्माण करावी आणि त्यानंतरच पाणीपट्टी दरवाढीसंदर्भात चर्चा करावी. - आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री
सध्याचे दर (प्रति हजार लिटर)
चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे ४.७६ रु.
झोपडपट्टी, प्रकल्पबाधित इमारती ५.२८ रु.
इतर घरगुती ग्राहक ६.३६ रु.
व्यावसायिक ग्राहक ४७.७५ रु.
बिगर व्यापारी संस्था २५.४६ रु.
उद्योगधंदे, कारखाने ६३.६५ रु.
रेसकोर्स, तारांकित हॉटेल ९५.४९ रु.
बाटलीबंद पाणी कंपन्या १३४.६४ रु