Join us

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांना महापालिका देणार मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:48 AM

नियोजन विकास खात्यासाठी अर्थसंकल्पात ८०० कोटींची तरतूद.

मुंबई : पालिकेच्या नियोजन विभागामार्फत समाजातील गरजू आणि अल्प उत्पन्न असलेल्या घटकांना सक्षमीकरणासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. यामध्ये गरजू महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, तृतीय पंथीय यांच्या सामाजिक कल्याणासाठी पालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. यंदा अर्थसंकल्पात विकास नियोजनासाठी ८०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत २००९ पासून महिला बचत गटांची स्थापना करण्यात येत आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिलांना केंद्रबिंदू मानून विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांना एकत्रित करून योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

यंदापासून प्रत्येक बचत गटाला प्रत्येकी एका लाख याप्रमाणे थेट आर्थिक साहाय्य दिले जाणार असल्याची माहिती स्वतः आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकासकामांत त्यांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी जेंडर बजेट अंतर्गत योजनांची अंमलबजावणी केली जाते.  जेंडर आरक्षणांतर्गत आधार केंद्रासाठीही जवळपास १३ कोटींची तरतूद आहे.   

१) पालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात येणार असून, तिथे त्यांच्या मनोरंजनासाठी सुविधा उपलब्ध असणार आहेत. 

२) दिव्यांगांना मदतीचा हात देण्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण, बसभाड्यात सवलत, स्कूटर अशा सवलतींसह यंदा अर्थसाहाय्य योजनाही सुरू करण्यात आली आहे.  

३) महिलांच्या स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी पालिकेच्या नियोजन विभागाकडून पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडपयंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका