रस्त्यालगत डेब्रिज टाकणाऱ्यांची खैर नाही; BMC आणखी सीसीटीव्ही लावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:56 AM2022-12-05T05:56:46+5:302022-12-05T05:57:06+5:30
सोसायट्यांत जनजागृती, महापालिकेने शहरातील रस्त्याच्या कडेला टाकलेले डेब्रिज तसेच पडून राहू नये, म्हणून ‘डेब्रिज ऑन कॉल’ची योजना राबवली आहे
मुंबई : मुंबईच्या रस्त्यालगत डेब्रिज टाकणाऱ्यांची यापुढे खैर नाही. पालिका डेब्रिज टाकणाऱ्यांवर वॉच ठेवणार असून, डेब्रिज ऑन कॉल या योजनेची पालिका प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. तसेच डेब्रिजबाबत प्रत्येक सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
महापालिकेने शहरातील रस्त्याच्या कडेला टाकलेले डेब्रिज तसेच पडून राहू नये, म्हणून ‘डेब्रिज ऑन कॉल’ची योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पालिका नागरिकांच्या घराजवळचे डेब्रिज उचलून डंपिंग ग्राउंडवर टाकते. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांतून निघणारे डेब्रिज रस्त्याच्या कडेला टाकले जाते आणि ते तसेच पडून राहते. अशा डेब्रिजची वाहतूक अनोळखी वाहनातून केली जाते. जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील अशा रस्त्याच्या बाजूला डेब्रिज टाकले जाते. डेब्रिज टाकणाऱ्यांवर पालिकेकडून दंड आकारला जातो. मात्र जेथे सीसीटीव्ही नसेल अशाच ठिकाणी चोरीछुप्या पद्धतीने डेब्रिज टाकले जात असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’ या अभियानाअंतर्गत डेब्रिज ऑन कॉल योजनेची पालिका प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे.
कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर आदी भागात काही अनोळखी ट्रकमधून डेब्रिज टाकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पालिकेचा अशा भागात आणखी सीसीटीव्ही बसवण्याचा विचार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी वांद्रे, खार, माहीम, अंधेरी विलेपार्ले परिसरातील सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. त्यासाठी सोसायट्यांमध्ये पत्रकेही पालिकेकडून वाटण्यात आली होती.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासोबतच, पालिकेने प्रत्येक सोसायटी आणि आस्थापनांपर्यंत पोहोचून त्यांना अशा योजनेची जाणीव करून देणार आहे.
इमारतीचे पाडकाम झाल्यावर निर्माण होणारे डेब्रिज रस्त्यावर न टाकता पालिकेच्या विभाग कार्यालयासह फोन केल्यास कर्मचारी येऊन डेब्रिज घेऊन जाणार आहे. यासाठी दर ही नाममात्र आकारण्यात येणार आहेत.