उघड्यावर राडारोडा टाकाल; वाहनाची नोंदणीच होईल रद्द, मनपाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:31 AM2024-01-31T10:31:41+5:302024-01-31T10:32:59+5:30

वडाळ्यात ५ जणांविरोधात तक्रार. 

BMC will suspend licence and registration in a bid of increased noise pollution on road | उघड्यावर राडारोडा टाकाल; वाहनाची नोंदणीच होईल रद्द, मनपाचा निर्णय

उघड्यावर राडारोडा टाकाल; वाहनाची नोंदणीच होईल रद्द, मनपाचा निर्णय

मुंबई : मुंबई पालिकेकडून वारंवार आवाहन करूनही मोकळ्या जागांमध्ये, मैदानात सर्रासपणे उघड्यावर राडारोडा (डेब्रिज) टाकण्याचे प्रकार सुरू आहेत; मात्र आता पालिकेने अशा तकरीविरोधात कडक कारवाई सुरू केली असून वडाळा येथील मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृतपणे डेब्रिज टाकणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मेहबुब पटेल (बोनसरी गाव), राजू केसबन नायडू (विजयनगर), रामदास मोनू प्रसाद (कुर्ला), मोहम्मद सलीम इबारत अली (भांडूप), उजैर अहमद मोहम्मद इसहार खान (वडाळा) अशी त्यांची नावे आहेत. 

यासाठी वापरण्यात आलेले आठ डंपर आणि एक पोकलेन मशिनही पालिकेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय डेब्रिज टाकणाऱ्या या वाहनाची नोंदणी रद्द करण्याबाबत परिवहन आयुक्तांना लेखी कळविण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. 

पालिकेच्या हद्दीमध्ये राडारोडा (डेब्रिज) टाकण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. तथापि, वडाळा येथील भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाच्या बाजूला ‘एमएमआरडीए’च्या मोकळ्या मैदानामध्ये डंपरच्या साहाय्याने काही व्यक्ती अनधिकृतपणे राडारोडा टाकत होते. 

पालिकेची ‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधा :

घरांची दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोडाची (डेब्रिज) व्यवस्था करण्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही सुविधा तयार करण्यात आली आहे.

३०० मेट्रिक टनांपर्यंतचा राडारोडा याची योग्य विल्हेवाट लावली जाते. राडारोडा घेऊन जाण्यासाठी पालिकेकडून वाजवी शुल्क आकारले जाते. ‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधेचा लाभ घेऊन नियमानुसार राडारोडाची विल्हेवाट लावावी, त्यासाठी कोणत्याही अनधिकृत मार्गांचा अवलंब करू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Web Title: BMC will suspend licence and registration in a bid of increased noise pollution on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.