पेपरलेस कामासाठी मुंबई महानगरपालिका घेणार अडीच हजार संगणक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:18 PM2021-08-04T13:18:07+5:302021-08-04T13:19:00+5:30
Mumbai Municipal Corporation News: मुंबई महापालिकेमध्ये पेपरलेस कामकाज सुरू आहे. यामुळे संगणकाचा वापर अधिक केला जातो आहे. मात्र, सध्या वापरण्यात येणारे संगणक जुने असल्याने दोन हजार ७६५ नवीन संगणक घेण्यात येणार आहेत. यासाठी २२.५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये पेपरलेस कामकाज सुरू आहे. यामुळे संगणकाचा वापर अधिक केला जातो आहे. मात्र, सध्या वापरण्यात येणारे संगणक जुने असल्याने दोन हजार ७६५ नवीन संगणक घेण्यात येणार आहेत. यासाठी २२.५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेने ई-ऑफिस, ऑटोडीसीआर, एसएपी, बायोमेट्रिक हजेरी या संगणक प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे. त्यामुळे विविध विभाग व पालिका कार्यालयांसाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर घेण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र, बरेच संगणक व उपकरणे पाच वर्षांपेक्षा जुने व कालबाह्य झाल्यामुळे विभागांच्या मागणीनुसार संगणक, प्रिंटर, स्कॅनरची खरेदी करण्यात येणार आहे. यात दोन हजार ७६५ संगणकांची खरेदी केली जाणार आहे. तसेच मिनी लेजर ए फोरसाइज प्रिंटर ५१०, मोनो इंक टँक ए फोर प्रिंटर २६५, मल्टीफंक्शन मोनो लेजर प्रिंटर ५०, एडीएफ डॉक्युमेंट स्कॅनर ३६० अशा उपकरणांचीही खरेदी केली जाईल.