सावकारी पाशाचा चौकशी अहवाल मागविला, विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:47 AM2022-08-23T05:47:22+5:302022-08-23T05:49:35+5:30

सावकारी पाशात अडकलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा भेट घेतली.

bmc workers who are stuck in govt procedure meets Vishwas Nangre Patil | सावकारी पाशाचा चौकशी अहवाल मागविला, विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली दखल

सावकारी पाशाचा चौकशी अहवाल मागविला, विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली दखल

Next

मुंबई :

सावकारी पाशात अडकलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर पाटील यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ‘लोकमत’ने महापालिका कर्मचाऱ्यांवरील सावकारीचा पाश उघड केला आहे. यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी मात्र कानाडोळा केला आहे. 

एल वार्डच्या घन व कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्यातून कुठलेही कर्ज घेतले नसताना खात्यातून परस्पर वसुली सुरू आहे. याबाबत एल वार्डच्या अधिकाऱ्यासह घन व कचरा व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त संगीता हसनाळे यांच्याकडेही तक्रारदारांनी अर्ज केले. हसनाळे यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांचे बँक खाते रिकामी होण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीही वेळ मिळत नसल्याने त्यांच्या संतापात भर पडली आहे. 

कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पुन्हा भेट घेत याबाबत सखोल चौकशीची मागणी केली. पाटील यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून चौकशी अहवाल ३० तारखेपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ३० ऑगस्टला पुढील पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. 

सावकारांकडून रेकी आणि भीती...: धाडस करून तक्रारीसाठी पुढे आलेल्या कर्मचाऱ्यांची सावकारांकडून माहिती घेणे सुरू झाल्याने आमच्या जीवाला धोका असल्याची भीती कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून त्वरीत चौकशी करण्यात येईल.
- इक्बालसिंह चहल, आयुक्त 

Web Title: bmc workers who are stuck in govt procedure meets Vishwas Nangre Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.