मुंबई : तुरळक पावसानंतरही शहर आणि उपनगरातील रस्त्यांची चाळण झाल्याने मुंबईकरांनी महापालिकेकडे तक्रारींचा पाऊस पाडला होता. मुंबईकरांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी खड्डे बुजविताना कंत्राटदारांनी वापरलेली सामग्री वरळी येथील प्रयोगशाळेत तपासण्याचे निर्देश दिले होते. या तपासणीत सात कंत्राटदारांचे नमुने सदोष आढळल्याने या कंत्राटदारांना महापालिकेने दणका दिला आहे. निकृष्ट पद्धतीने खड्डे भरणाऱ्या या कंत्राटदारांना महापालिकेने ३९ लाखांचा दंड ठोठावला आहे.प्रयोगशाळेमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये महापालिकेच्या एन, के/ पश्चिम, आर/ मध्य या विभागांमधील नमुने सदोष आढळून आले. त्यामुळे परिमंडळ ४ (के/पश्चिम विभाग) व परिमंडळ ६ (एन विभाग)मध्ये कार्यरत असणाऱ्या योगेश कन्स्ट्रक्शन व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास १० लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर परिमंडळ ७ (आर/मध्य विभाग)मध्ये कार्यरत असणाऱ्या कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास रुपये ५ लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तसेच कोल्डमिक्स बॅगेवर उत्पादकाचा तपशील नसणे, कोल्डमिक्स बॅग्ज फाटलेल्या असणे किंवा सीलबंद नसणे, कोल्डमिक्स गुणवत्ता तपासणीसाठी संबंधित उत्पादकाचे अभियंता उपलब्ध नसणे आदी त्रुटींसह आर/उत्तर, आर/दक्षिण व जी/दक्षिण या विभागांमध्ये संबंधित साहित्यांचा साठा करण्यासाठी स्वतंत्र गोडाऊन नसणे अशा प्राथमिक त्रुटींसाठी प्रत्येक विभागनिहाय संबंधित कंत्राटदारांना प्रत्येकी रुपये १ लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तसेच योगेश कन्स्ट्रक्शन्स व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांना रुपये १० लाखांच्या दंडाशिवाय आणखी ६ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर यांना आणखी ३ लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
महापालिकेचा दणका
By admin | Published: August 19, 2015 1:25 AM