दूषित सरबत विक्रेत्यांवर मुंबई महापालिकेची नजर; विशेष पथकाची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 03:23 AM2019-03-30T03:23:22+5:302019-03-30T03:23:40+5:30
कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे.
मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणाऱ्या दूषित लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. रेल्वे प्रशासनाने फलाटांवरील अशा सरबतांच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर आता महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. त्यानुसार नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक सरबत, थंड पेयांची विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्याला थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. या कारवाईसाठी विभागस्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
कडक उन्हामुळे मुंबईत थंड पेय, सरबताची मागणी वाढली आहे. रस्त्यावर, रेल्वे स्थानकांवरील थंड पेयांच्या स्टॉल्सवर गर्दी होऊ लागली आहे. मात्र अनेक ठिकाणी सरबत बनविण्यासाठी दूषित पाण्याचा वापर होतो. तसेच काही ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करताच सरबत तयार होत असते. यामुळे गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याची भीती असल्याने दरवर्षीच उन्हाळ्यात अशा सरबतांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकावर तयार केल्या जाणाºया लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दूषित सरबत विक्रीचा विषय नव्याने चर्चेत आला आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील लिंबू सरबत आणि कालाखट्टावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता मुंबईतील रस्त्यांवर विक्री होत असलेल्या सरबत, शीतपेयांवरही पालिकेने कारवाई सुरू केली आहे. शीतपेय विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरही कारवाई सुरू असून यामध्येही अस्वच्छता, आरोग्यास हानिकारक पद्धतीने काम होत असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
...तर परवाना होणार रद्द
पालिका अधिकारी-कर्मचारी सरबत विक्रेत्यांंकडून वापरण्यात येणाºया पाण्याचे नमुने घेत आहेत. सरबत बनविण्याच्या प्रक्रियेवरही नजर ठेवण्यात येत आहे. विक्रीसाठी ठेवलेले शीतपेय नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे आढळून आल्यास तो सर्व साठा तातडीने नष्ट करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर विक्रेत्यांवर न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात येईल. तो तयार करीत असलेले सरबत आरोग्यास हानिकारक असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाल्यास त्याचा परवानाही रद्द होऊ शकतो, असे पालिकेच्या अधिकाºयाने सांगितले.