Join us

BMC ची सुरक्षा वाऱ्यावर; सुरक्षारक्षकच असुरक्षित, ड्युटीची वेळ १६ तासांची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 11:43 AM

महापालिकेत गेल्या ९ वर्षात भरतीच नाही, ८४९ जण प्रतीक्षेत

रतींद्र नाईक 

मुंबई : मुंबईनगरीचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महापालिकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षक पदाची भरती प्रक्रिया लटकली असून, ८४९ उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या ९ वर्षांत भरती प्रक्रिया न राबविली गेल्याने १,७८७ रिक्त पदे केव्हा भरणार?, असा प्रश्न या सुरक्षा रक्षकांना पडला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षा रक्षकांना तब्बल १६ तास ड्युटी करावी लागत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालय, मुंबईतील २४ वॉर्ड कार्यालये, रुग्णालये, मालमत्ता विभाग, तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे, पंपिंग स्टेशन्स या सर्वांची सुरक्षा पालिकेच्या सुरक्षा विभागाकडून केली जाते. ३ हजार ८०९ इतकी सुरक्षा रक्षकांची एकूण पदे असून, त्यातील १,७८७ पदे रिक्त आहेत. ८४९ पदे भरण्याचा निर्णय पालिकेने जानेवारी २०२२ मध्ये घेतला. प्रशासनाकडून त्याला मंजुरी देण्यात आली. सहा महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना वर्ष उलटून गेले तरी देखील पदे भरली गेलेली नाहीत. 

विभागांचा अतिरिक्त चार्जमुंबई महापालिकेतील सुरक्षा रक्षकांच्या कमी संख्येमुळे कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत आहे. येथील सुरक्षा रक्षकांना १६ तास ड्युटी करावी लागत आहे. इतकेच नव्हेतर, विविध विभागांचा अतिरिक्त चार्ज या सुरक्षा रक्षकांना देण्यात आला आहे. त्यामुळे ड्युटी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.

निवड प्रक्रियेची अर्हता बदलल्याने निवडणूक प्रक्रियेला वेळ लागत आहे. ‘एमपीएससी’च्या धर्तीवर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकदा निवडप्रक्रिया निश्चित झाल्यास पुढच्या वेळी उमेदवारांच्या निवडीस वेळ लागणार नाही. - अजित तावडे, प्रमुख, सुरक्षा रक्षक अधिकारी

टॅग्स :मुंबई महानगरपालिका